*कोंकण एक्सप्रेस*
*आर्ट ऑफ लिव्हिंगची सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा १७ ला कणकवलीत*
*भाविकांसाठी रुद्रपूजा आणि दर्शन सोहळा*
*कणकवली : प्रतिनिधी*
वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी जी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक १७ जून २०२५ रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपुजा आयोजित करण्यात आली आहे. दोन टप्प्यात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० ते १२ यावेळेत उत्कर्षा हॉटेलच्या वर, बस स्टँड समोर, कणकवली येथे रुद्रपूजा व दर्शन आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ प.पु. भालचंद्र महाराज मठ कणकवली येथे दर्शन सोहळा होणार आहे. दर्शन सोहळा पूर्णपणे मोफत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या यात्रे बाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, अकराव्या शतकात, (इ.स. १०२६ मध्ये) क्रूर महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर चढाई केली आणि पवित्र शिवलिंगाचे तुकडे तुकडे केले. मंदिर नष्ट झाले, पण काही निष्ठावंत पुजाऱ्यांनी गुपचूप त्याचे काही अवशेष वाचवले. या पवित्र अंशाना त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन लपवले आणि पिढ्यानपिढ्या हे रहस्य जपले गेले. जवळपास एक हजार वर्षे, हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित राहिले, भक्तांच्या श्रद्धेने जिवंत ठेवले गेले.
कालांतराने, नियतीच्या खेळाने हे अवशेष गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्यापर्यंत पोहोचले. काही संत म्हणतात, हा दैवी संकेत होता; प्राचीन पुजारी पुरोहितांच्या वंशजांनी गुरुदेवांना हे पवित्र अंश सुपूर्द केले. गुरुदेवांनी त्यांचे आध्यात्मिक महत्त्व ओळखून भक्तांसाठी महाशिवरात्रीच्या भव्य सोहळ्यात याचा लिंगाभिषेक केला. हेच शिवलिंग. आता कणकवलीत येत आहे. त्याचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार दि. १७ जून २०२५ रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत रुद्रपुजा व दर्शन अर्थात रुद्रपुजा संकल्प होणार आहे. हा कार्यक्रम उत्कर्षा हॉटेलच्या वर, बस स्टैंड समोर, कणकवली येथे होणार आहे. यासाठी नोंदणी आवश्यक आहे. त्याच बरोबर सायंकाळी ४ ते ९ या वेळेत परमपूज्य भालचंद्र महाराज मठ, कणकवली येथे या शिवलिंगाचे दर्शन घेता येणार आहे. हे दर्शन सर्वांसाठी मोफत असेल. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 96574 79866 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.