*कोंकण एक्सप्रेस*
*निबंध स्पर्धेत अनिकेत कुंडगीर प्रथम, तर विद्या परब द्वितीय*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात अनिकेत सदाशिव कुंडगीर यांनी प्रथम तर विद्या सुनिलदत्त परब यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
निबंध स्पर्धेसाठी ‘अहिल्याबाई होळकर ः एक आदर्श शासिका आणि जनसेविका‘ तसेच ‘शौर्य, सेवा आणि श्रद्धेचा संगम ः अहिल्याबाई होळकर‘ आदी विषय ठेवण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी केले. या स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना ५ जून रोजी सकाळी ११ वाजता शिरोडा नाका (गणेश मोबाईल शॉपीच्या वर) येथील भाजपा कार्यालयात गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उपक्रमाचे जिल्हा समन्वयक प्रसन्ना देसाई, मंडल अध्यक्ष पपू परब व स्पर्धाप्रमुख अॅड. सुषमा खानोलकर यांनी केले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरील विजेते निबंध जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहेत.