इयत्ता दहावीच्या वर्षांत आई–वडिलांचा अपघात , आईचे निधन ; तरीही जुळ्या बहिणींचे नेत्रदीपक यश

इयत्ता दहावीच्या वर्षांत आई–वडिलांचा अपघात , आईचे निधन ; तरीही जुळ्या बहिणींचे नेत्रदीपक यश

*कोंकण एक्सप्रेस*

*इयत्ता दहावीच्या वर्षांत आई–वडिलांचा अपघात , आईचे निधन ; तरीही जुळ्या बहिणींचे नेत्रदीपक यश*

*मालवण ः प्रतिनिधी*

इयत्ता दहावीचे वर्ष सुरु असतानाच आणि परीक्षा एक महिन्यावर येऊन ठेपलेली असताना आई वडिलांचा अपघात होऊन त्यात आईचे दुर्दैवी निधन होऊन दुःखाचा डोंगर कोसळला असताना या दुःखातून सावरतानाच एकीकडे कष्ट व दुसरीकडे अभ्यास सुरु ठेवत समृद्धी जनार्दन मांजरेकर व सिद्धी जनार्दन मांजरेकर या जुळ्या बहिणींनी दहावी परीक्षेत नेत्रदीपक असे यश प्राप्त केले. समृद्धी हिने मालवण मधील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कुल मधून दहावीत ८८.४० टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. तर वेताळ बांबर्डे येथे राहणाऱ्या सिद्धी हिने शिवाजी इंग्लिश स्कुल पणदूर या शाळेतून ९५. ४० टक्के गुण मिळवून शाळेत चौथा क्रमांक मिळविला. आई सोडून गेल्याचे दुःख आणि जखमी वडीलांवर उपचार सुरु असतानाही कष्ट व जिद्द न सोडता या जुळ्या बहिणींनी मिळविलेल्या यशाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
मालवण भरड येथे मांजरेकर कुटुंब वास्तव्यास असून जनार्दन मांजरेकर व त्यांची पत्नी स्व. वसुंधरा मांजरेकर या दाम्पत्याचा २२ डिसेंबर २०२४ रोजी बार कौन्सिलने ठेवलेल्या शासकीय योजनेच्या कार्यक्रमाला जाताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कार ड्रायव्हरने त्यांना ठोकर दिल्याने कुडाळ येथे अपघात झाला होता. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन यामध्ये वसुंधरा मांजरेकर यांचे निधन झाले. तर गंभीर जखमी जनार्दन मांजरेकर यांच्यावर उपचार करण्यात आले. आई वडिलांचा अपघात होऊन आईचे छत्र हरपल्याने त्यांचा मुलगा ऐश्वर्य, मुली भाग्यश्री, समृद्धी व सिद्धी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मांजरेकर दाम्पत्याने अपार कष्टातून मुलांना शिक्षण दिले. मुलगा ऐश्वर्य याने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. तर भाग्यश्री ही वकिलीचे शिक्षण घेत आहे. तर समृद्धी व सिद्धी या जुळ्या बहिणी दहावीचे शिक्षण घेत होत्या. समृद्धी ही वडिलांना हॉटेल कामात मदत करायची तसेच आईला शेती कामात मदत करायची. आई वसुंधरा मांजरेकर यांना गावाची ओढ व निसर्गाची आवड होती म्हणून ती वेताळ बांबर्डे या आपल्या गावी राहून सिद्धी हिचा सांभाळ करायची. सिद्धी ही गावी राहून शिक्षण घेत होती. सिद्धी घरची शेती, बागेतील कामे करून, गुरे सांभाळून अभ्यास करत होती. तर शाळेसाठी वेताळ बांबर्डे ते पणदुर असा एसटी बस किंवा सायकलने प्रवास करत असे.

आई वडिलांच्या अपघातामुळे समृद्धी व सिद्धीला मोठा मानसिक धक्का बसला होता. या दुःखातून सावरताना एक महिना अभ्यासाकडे दुर्लक्ष झाला. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता दोघींनी आपले कष्ट व अभ्यास सुरु ठेवत दहावीच्या परीक्षेची तयारी करत दहावीत उत्तम टक्केवारीने गुण मिळवीत यश मिळविले. दोघींनाही त्यांच्या शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तर भाऊ ऐश्वर्य व बहीण भाग्यश्री यांचा आधार लाभला.

दहावी नंतर समृद्धीला स्पर्धा परीक्षांची तयारी करून आयपीएस व्हायचे स्वप्न आहे, तर सिद्धीचे जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न आहे. दुःखातही कष्ट व जिद्द कायम ठेवत यश मिळविणाऱ्या समृद्धी व सिद्धी मांजरेकर यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी ज्या संस्था किंवा व्यक्तींना मदत करायची असल्यास भाग्यश्री मांजरेकर ७८२१९२७९०९, ९१५८१४०४०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!