सिंधुदुर्गात ११५ ग्रामसेवक पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी

सिंधुदुर्गात ११५ ग्रामसेवक पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गात ११५ ग्रामसेवक पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी*

*सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जि. प. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण घेवाणीतुन ग्रामसेवकांना केले मुक्त*

*माजी आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक आरोप*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३२ ग्रापंचायती असून त्यासाठी केवळ ३१७ ग्रामसेवक कार्यरत आहेत. तर ११५ ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकावर दोन दोन ग्रा.प.चा कारभार देण्यात आला असून परिणामी ग्रामपंचायतींचा कारभार धीम्या गतीने सुरु आहे. विविध योजनांची कार्यवाही ठप्प आहे. असे असताना जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे आर्थिक देवाण घेवाणीतुन जिल्ह्यातील ग्रामसेवकांना जिल्ह्याबाहेर बदली मिळवून देत आहेत. पहिल्या टप्प्यात १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.आणि पुढील टप्प्यात २५ ग्रामसेवकांना आंतरजिल्हा बदली मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदलीतुन जिल्ह्यातील सत्ताधारी लोप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत असा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
वैभव नाईक पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामसेवकांची आधीच कमतरता असताना कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांना आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्याबाहेर सोडले जात आहे. त्यामुळे दोन दोन ग्रा. प. चा कारभार एका ग्रामसेवकावर येत असून गावाचे विकास आराखडे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच व सदस्यांना अडथळा ठरत आहे. व्यक्तिशः लाभाच्या योजना देखील ठप्प आहेत. ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे ग्रामपंचायतीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. ग्रामसेवक नसल्याने योग्य माहिती अभावी सरपंच चुकीच्या पद्धतीने कारभार हाताळत असून त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाया होत आहेत. त्यासाठी ग्रामसेवकांची रिक्त पदे भरणे गरजेचे असताना मात्र सत्ताधारी लोप्रतिनिधी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांकडून पैसे घेऊन त्यांना हवे त्याठिकाणी बदली मिळवून देत आहेत. आणि त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांना साथ देत आहेत असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!