*कोंकण एक्सप्रेस*
*ठेकेदार जगला पाहिजे याची काळजी देवगड जामसंडे नगरपंचायत घेतेय नगरसेवक नितीन बांदेकर यांचा आरोप*
*देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचे अध्यक्षतेखाली संपन्न*
*देवगड (प्रतिनिधी)*
देवगड जामसंडे नगरपंचायत स्थापन होणार आता दहा वर्षे होत आली तरीही आपल्या वार्डातील मंजूर कामे तीन-चार महिने का होत नाहीत. आपल्या वार्डाचा विकास तीन-चार वर्षे होत नसतील तर प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे . ठेकेदारांना पाठीशी घालणे कितपत योग्य आहे याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावे . देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये ठेकेदारांएवढे कोणाचेच लाड केले जात नाही. ठेकेदार जगला पाहिजे याची काळजी देवगड जामसंडे नगरपंचायत घेतेय असा खळबळ जनक आरोप ठाकरे गट शिवसेनेचे नगरसेवक नितीन बांदेकर यांनी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत केला.
देवगड जामसंडे नगरपंचायतीची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचे अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे, उपनगराध्यक्ष मिताली सावंत,बांधकाम सभापती शरद ठुकरुल,पाणी पुरवठा सभापती प्रणाली माने,स्वच्छता व आरोग्य सभापती आज्ञा गुमास्ते , सर्व नगरसेवक नगरसेविका आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक बांदेकर पुढे म्हणाले, देवगड निपाणी रोड नजीक पीडब्ल्यूडीच्या कामामुळे नळ योजनाची पाईपलाईन फुटली, एसटीच्या कामामुळे देखील नळ योजनेची पाईपलाईन फुटली मात्र त्यांना फक्त पत्र दिले. पण प्रत्यक्ष संबंधितांकडून कृती झालेली का नाही. आणि त्यावर नगरपंचायतीची कारवाई का नाही, यावर नगरपंचायतीने खर्च का करावा यामुळे नगरपंचायतीचे नुकसान होते. या यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे असेही बांदेकर म्हणाले.
दहिबाव येथील अन्नपूर्णा नळयोजनेचे ९ कोटी ५० लाख रक्कमेचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही.तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करू नये.पाणीपुरवठा अभियंता पद रिक्त आहे.त्यासाठी कायमस्वरूपी नेमणूक करणे आवश्यक आहे अशी सूचना पाणीपुरवठा सभापती प्रणाली माने यांनी यावेळी मुख्याधिकारी यांना केली. तसेच देवगड शहरातील जे नळ कनेक्शन आहेत त्यांना अर्धा , पाऊण , एक इंची पाईपलाईन मधून पाणीपुरवठा होतोय त्यांना सूचना देऊन पाणीपुरवठा करामध्ये बदल करण्यात यावा. अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
नगरपंचायत मधून सध्या सर्वच १७ प्रभागात कामे सुरू आहेत.यातील काही कामे एकाच ठेकेदाराला दिली जात आहेत .जोपर्यंत एक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ठेकेदारांना दुसरे काम देऊ नका. ठेकेदाराकडून कामास विलंब होतोय यामुळे सर्वसामान्य जनतेचा रोष त्या त्या विभागातील नगरसेवकांवर होतोय.यावर प्रशासनाचा अंकुश असावा अशी सूचना देखील नगरसेवक संतोष तारी यांनी केली.
नगरपंचायत हद्दीमध्ये सोलर कनेक्शन साठी प्रस्ताव पाठवायचे आहे हे प्रस्ताव पाठविताना स्थानिक नगरसेवकांना विचारात घ्यावे अशी मागणी देखील यावेळी नगरसेवक बुवा तारी यांनी केली. देवगड जामसंडे शहराचा कचरा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. या विषयावर तसेच पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे त्यामुळे वाहतुकीला अडचण ठरत आहे या संदर्भात व नगरपंचायत प्रलबित प्रश्नावर देखील चर्चा करण्यात आली.
देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये नव्याने बदलून आलेले सुपरवायझर यांना नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोणत्याही वॉर्डची माहिती नसल्याने त्यांच्यासोबत नगरपंचायतीच्या एक दुसरा कर्मचारी द्यावा अशी सूचना देखील यावेळी सभापती प्रणाली माने यांनी केली.