कुर्ली घोणसरी धरणात बुडून कोकिसरे येथील गॅरेज मालकाचा मृत्यू

कुर्ली घोणसरी धरणात बुडून कोकिसरे येथील गॅरेज मालकाचा मृत्यू

*कोकण Express*

*कुर्ली घोणसरी धरणात बुडून कोकिसरे येथील गॅरेज मालकाचा मृत्यू*

*कणकवली ः प्रतिनिधी*

घोणसरी धरण कालव्यातील धबधब्याजवळ होळी – धुलिवंदन निमित्त मौज मजा करायला गेलेल्या तरुणांपैकी दोघे तरुण बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या कोकिसरे येथील तरुणाचा घोणसरीतील ‘त्या’ कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला. मयत तरुण सुधीर गोविंद कदम (वय 30) सध्या राहणार कोकिसरे, नारकरवाडी, मूळ रा. पाडळी खुर्द, ता.करवीर, जि.कोल्हापूर असे नाव आहे. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद अमोल महादेव कदम वय 32 यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनला दिली.

सोमवारी होळी – धुलिवंदन असल्याने कोकिसरे – वैभववाडी येथील 7 ते 8 जण तरुण मौज मज्जा करण्यासाठी कुर्ली -घोणसरी येथील धरण परिसरात गेले होते. तेथे काही मित्र मंडळी जेवण करत होते. तर काहीजण दुपारी कडक ऊन असल्याने पोहण्यासाठी काही वेळ कालव्यात उतरले. दरम्यान, त्यातील पोहणारे दोघे युवक पाण्यात बुडाले. अन आरडाओरड झाली तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी मयत सुधीर कदम या विवाहित तरुणाने पाण्यात उडीमारून दोघांना भोवर्‍यातून बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र स्वतः सुधीर धबधब्याच्या भोवर्‍यात काही मिनिटे अडकला. त्यावेळी अन्य मित्रांनी त्याला बाहेर काढत. प्रथमतः पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तद्नंतर त्याला वैभववाडी येथे उपचारासाठी आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

सुधीर कदम याचे कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालय, नजीक फोर व्हीलर दुरूस्तीचे गॅरेज आहे. तो कोकिसरे येथे गेली चार वर्षे चार चाकी वाहने दुरूस्ती करून कुटुंब चालवीत होता. त्याचा एकवर्षापूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर वैभववाडी शहरातील मित्रमंडळीनी हळहळ व्यक्त केली.

त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेचा पंचनामा वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मारुती सोनटक्के, श्रीकृष्ण पडवळ यांनी ग्रामीण रुग्णालय येथे या घटनेचा पंचनामा केला.

यावेळी ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे मनसे तालुका अध्यक्ष सचिन तावडे, दत्ता गुरव,रोहित रावराणे,विवेक रावराणे, व्यापारी बंडू सावंत,मेकॅनिक असिफ आरवाडे व वैभववाडी शहरातील शिक्षक, पोलीस, विविध क्षेत्रातील त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.रात्री उशिरा पाडळी, ता.करवीर येथील मूळ गावी अंत्य संस्कारासाठी नेला.घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!