*कोकण Express”
*विहिरीत कोसळलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाने केले जेरबंद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कळसुली-मधलीवाडी येथील गोपाळ दळवी यांच्या विहिरीत कोसळलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने पिंजर्यात जेरबंद केले. रविवारी (ता२८) सकाळी विहिरीत पडलेला बिबट्या श्री.दळवी यांच्या निदर्शनास आला होता. दुपारी साडे बाराच्या सुमारास वनविभागाने या बिबट्याला विहिरीत पिंजरा सोडून जेरबंद केले. नंतर त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले. कळसुली-मधलीवाडी गोपाळ दळवी हे विहिरीतील पंप सुरू केल्यानंतरही पाणी येत नसल्याने विहिरीकडे गेले. तेव्हा विहिरीमधील पंपाचा पाईप बिबट्याने पकडल्याचे त्यांच्या लक्षात आले. श्री.दळवी यांची चाहूल लागल्यानंतर बिबट्यानेही मोठी डरकाळी फोडली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास वनविभागाचे पथक पिंजरा घेऊन कळसुलीत दाखल झाले. अवघ्या पंधरा मिनिटात या पिंजर्यामध्ये बिबट्याने प्रवेश केला. यानंतर या बिबट्याला घेऊन वनविभागाचे पथक रवाना झाले. कणकवली वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिगवळे वनपाल टी. बी. दळवी, कळसुली वनरक्षक एस. के. गळवे, नरडवे वनरक्षक प्रतिराज शिंदे, देवगड वनरक्षक रानबा बिक्कड, वैभववाडी वनरक्षक अमिर काकतीकर, भिरवंडे वनरक्षक अविनाश राठोड, वनमजूर मधु सावंत, खारेपाटण वनरक्षक माळी, दिगवळे वनरक्षक पल्लवी दाभाडे, वनरक्षक कुंभवडे वैशाली कुंभार, खारेपाटण वनरक्षक शेगावे आदी अधिकारी कर्मचारी बिबट्या पकड मोहीम सहभागी झाले होते.