*कोंकण एक्सप्रेस*
*जैतिर उत्सवाला फुलला भक्तीचा मळा*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
तुळस येथील प्रसिद्ध जैतिर उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या मुख्य आणि पहिल्या दिवशी ंसंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य ठिकाणांहून भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने मंदिर परिसरात भक्तीचा मळा फुलला.
नराचा नारायण बनलेला हा जैतिर उत्सव तुळस गावातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवाला माहेरवाशिणींबरोबरच अन्य भाविकही उपस्थिती दर्शवित असतात. त्यामुळे अलोट गर्दी पहायला मिळते. यंदा हा उत्सव सोमवार दि.२६ मे पासून सुरु झाला आहे. या उत्सवासाठी येणा-या भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे तसेच दुकानदारांनाही आपल्या मालाची विक्री व्यवस्थित करता यावी यासाठी देवस्थानतर्फे गेले काही दिवस नियोजन सुरु होते. आज उत्सवादिवशी पहाटेच श्रींची पूजा झाल्यानंतर सकाळपासून भाविकांनी मंदिरात गर्दी करीत श्रींचे दर्शन घेत नवसाची फेड केली. तर नविन नवसही बोलण्यात आले. दुपारनंतर मंदिराकडे भाविकांची गर्दी वाढू लागली. मांडावर खेळणा-या देवाचा आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांची गडबड दिसत होती. तसेच मंदिर परिसरात केळी, नारळ, ओटी, मिठाई, खाद्यपदार्थ तसेच जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही मांडण्यात आली होती. या उत्सवाला घोंगड्याही विक्रीसाठी आल्या होत्या. काहींनी याची खरेदीही केली.