*कोंकण एक्सप्रेस*
*विजेच्या होणा-या बिघडास वीज मंडळच जबाबदार*
*वेळीच लक्ष न दिल्यास जन आंदोलन होण्याची शक्यता*
*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव*
वीजेची गरज असताना जर वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे घरगुती ग्राहक व व्यावसायीक यांना ती मिळाली नाही तर वेंगुर्ला तालुक्यातील नागरीक विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर जन आंदोलन छेडतील असा इशारा जि.प.चे माजी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मकरंद परब यांनी लेखी निवेदनाद्वारे विद्युत कंपनीच्या वेंगुर्ला उपकार्यकारी अभियंता यांना दिला आहे.
श्री. परब यांनी निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ला तालुक्यातील वारंवार खंडित होणा-या विज पुरवठ्याबाबत त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. या भागातील नागरीक हे सहनशील आहेत. त्यांचा अंत पाहू नका. सध्या वीज ही २४ तास वापराची जीवनावश्यक गरज बनली आहे. वीजेचा वापर घरगुतीप्रमाणे विविध व्यावसायीकही करीत आहेत. जर गरजेच्यावेळी वीज नसेल तर वीज घेऊन त्याचा काय फायदा? असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे.
वेंगुर्ला तालुका हा समुद्रालगत येत आहे. त्यामुळे येथील लोखंडी विद्युत पोल व विद्युत तारा या खा-या हवेमुळे गंजून निकामी होत असतात. तसेच याठिकाणी नारळ, पोफळी, आंबा, काजू यांची झाडे तसेच मोठ्या प्रमाणात वने असून त्या भागामधून विद्युत प्रवाह पोलद्वारे ग्राहकांना देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत झाडे ही काही शासकीय नियमामुळे शेतकरी तसेच विद्युत कंपनीच्या कर्मचा-यांना तोडता येत नसल्याने याचा फटका वादळी वारे, नदी, डोंगर, येणारे पूर यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत असतो. याची सुरूवात पहिल्याच पावसाने झाली आहे. वेंगुर्ला तालुक्यामध्ये याचा फटका सुरूवातीलाच बसलेला असून सरकारी कार्यालये तसेच इतर व्यवसाय हे विद्युत पुरवठ्यावरच अवलंबून असून खंडीत विज पुरवठ्यामुळे वारंवार आम जनतेचे नुकसान होत आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील भुयारी विद्युत वाहिनी कुडाळ ते वेंगुर्ला तसेच काही वादळी पट्ट्यातील गावामध्ये भुयारी विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम खाजगी कंपनीला देण्यात आलेले आहे. गेली २ वर्षे वेंगुर्ला, कुडाळ रस्त्यालगतहून भुयारी विद्युत वाहिनी जोडण्याचे काम अद्याप प्रगतीपथावर नाही. या संदर्भातील कारण अद्याप समजू शकलेले नाही. संबंधित आपला उपविभाग, कार्यकारी अभियंता तसेच तालुक्यातील महसुल प्रशासन, पोलीस यंत्रणा यांचेकडूनही अद्याप या गोष्टीची दखल घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. तरी वेंगुर्ला तालुक्यातील जनतेचा उद्रेक होईपर्यंत आपण वाट पाहू नये, अन्यथा आपल्या चुकांमुळे होत असलेल्या गलथान कारभाराला आपणच जबाबदार आहात. तरी याचा त्वरीत गांभीर्यपूर्वक विचार करुन तातडीने याकामी पावले उचलावीत. अन्यथा आपल्या कार्यालयावर जनमोर्चा येवू शकतो याची वेळीच दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.