*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण- बेळणे मार्गावरील राठीवडे – असगणी फाट्याजवळ संरक्षक भिंत व अन्य मोरीची कामे निकृष्ट दर्जाची*
*संबंधित कामाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याकडे तक्रार दाखल*
*मालवण – प्रतिनिधि*
मालवण- बेळणे मार्गावरील राठीवडे – असगणी फाट्याजवळ जिल्हा वार्षिक योजनेतून चालू असलेले संरक्षक भिंत व अन्य मोरीची कामे योग्य प्रकारे होत नसून या कामाबाबत राठीवडे ग्रामपंचायत सरपंच सौ. दिव्या धुरी, उबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष धुरी वं ग्रामस्थांनी संबंधित कामाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याकडे तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत कोणत्याही प्रकारची दखल व चौकशी न केल्याने याबाबत सरपंच दिव्या धुरी, सुभाष धुरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मालवण बेळणे मार्गावरील रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून रस्ता साईडपट्टी व संरक्षक भिंत तसेच अन्य ठिकाणी मोरीची कामे यावर्षी चालू करण्यात आली. असगणी फाटा येथे रस्ता संरक्षक भिंतीचे काम मागील कित्येक दिवसांपासून सुरु असून या कामाच्या दर्जाबाबत ग्रामपंचायत वं ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली आहे. या कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी पाहणी केली असता बांधकामासाठी वळू ऐवजी क्रशरची ग्रीट (बारीक पावडर) वापरत असल्याचे तसेच सिमेंटचे प्रमाणही योग्य नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्यात काँक्रीट घालूनही बांधकामावर पाण्याचा मारा योग्यप्रकारे झाला नसल्याचा आरोपही करण्यात आला. बांधकाम ठिकाणी माती असून मातीवरच काही ठिकाणी काँक्रीट घालण्यात आले आहे.
या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांना संशय आल्याने कामाची पाहणी करून त्याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याकडे तक्रार केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या निधीतून चालू असलेल्या या कामाचा दर्जा पाहता काम योग्यप्रकारे होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करावी व आपल्याला माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत योग्यप्रकारे कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ पातळीवर दाद मागण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनीही दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.