*कोंकण एक्सप्रेस*
*गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकर विचार तळागाळापर्यंत पोहोचवा
भिमराव आंबेडकर यांचे आवाहन ः जानवली येथे बुद्ध विहाराचे लोकार्पण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
१९३८-१९४० या कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार परिषदा घेऊन समाजाला जागृत करण्याचे काम केले. डॉ. आंबेडकर १४ मे १९३८ मध्ये जानवली येथे महार परिषद घेतली. या परिषदेचे अमृतमहोत्सवी वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधव व बहुजनांनी साजरे केले. डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जानवली भूमीत भारतीय बौद्ध महासभेच्या मुंबई व जानवली शाखेने नव्याने लुंबिनीवन बुद्ध विहार बांधले आहे. या बुद्ध विहाराच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांच्या अनुयायांनी करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भिमराव आंबेडकर यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभेच्या जानवली शाखा व जानवली बौद्ध विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने बांधण्यात आलेल्या लुंबिनीवन बुद्ध विहारचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी डॉ. भिमराव आंबेडकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जानवली बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष सुनील पवार, स्वागताध्यक्ष तथा जानवलीचे सरपंच अजित पवार, भंते धम्मानंद, कश्यप, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, उपसरपंच किशोर राणे, भारतीय बौद्ध महासभेचे महिला जिल्हाध्यक्षा प्रा. सुषमा हरकुळकर, तालुकाध्यक्ष भाई जाधव, पोलीस पाटील मोहन सावंत, माजी पोलीस पाटील पांडुरंग राणे, महिला तालुकाध्यक्षा आशाताई संजय भोसले, डॉ. सतीश पवार, अॅड. मोहन राव, जिल्हा माजी अध्यक्ष विश्वनाथ कदम ,महासभेच्या प्रचार व पर्यटन विभाग सचिव दीपक कांबळे, संरक्षण विभागचे दिलीप तंरदळेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, तालुका शाखेचे सचिव सुभाष जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, पाडुरंग राणे, भारतीय बौद्ध महासभेचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, धनाजी जाधव, प्रभाकर जाधव, भिकाजी जाधव, मोहन जाधव, सूर्यकांत कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भिमराव आंबेडकर म्हणाले, जानवली गावाला मोठा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. कोकणात मोठ्या धम्म परिषदा होत नाहीत, हा गैरसमज आहे. दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्हयात मोठी धम्म परिषद झाली. या परिषदेला मी उपस्थित होतो, असे त्यांनी सांगितले.
१९३८-४०मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार-मांतग परिषदा घेऊन या समाजाला जागृत करण्याचे काम केले. १४ मे १९३८ मध्ये डॉ. बाबासाहेबांनी जानवली येथे महार परिषद घेतली. या परिषदेमुळे दलित समाजबांधव जागृत होऊन कोकणात सामाजिक परिवर्तन घडले. महाराष्ट्रातील विविध भागांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जपण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले. सोलापूर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ११ वेळा आले. सोलापुरात अलीकडचे धम्म परिषद पार पडली. या परिषदेला मी उपस्थित होते. याशिवाय साहित्यिक व राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळीदेखील परिषदेला उपस्थित होती. या परिषदेत सध्या राजकीय, सामाजिक, आर्थिकस्थितीवर विचारमंथन झाले, असे त्यांनी सांगितले.
जानवली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा भारतीय बौद्ध महासभेच्या जानवली शाखा व जानवली बौद्ध विकास संघाने आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करताना त्या कार्यक्रमाचे गांभीर्य समाजबांधवांना कळले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरंभी बौद्ध समाजातील युवती व महिलांनी स्वागत गीत म्हटले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांचा परिचय प्रा. राहुल पावार यांनी करून दिला. सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव व आंबेडकरांचे अनुयायी उपस्थित होते.