*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणच्या सुधारित नळपाणी योजनेचे काम संथ गतीने सुरु*
*आमदार निलेश राणे यांची नाराजी*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण शहर आपले आहे या भावनेतून नगरपालिका प्रशासनाने काम करावे. कोणत्याही कामाची गती आणि विकास यातच मला जास्त रस आहे. त्यामुळे मालवण शहरात दर्जेदार कामे करून करून घ्यावीत, अपूर्ण कामे पूर्ण करावीत, मालवण शहराच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सुधारित नळपाणी योजनेचे काम संथ गतीने सुरु असून ते जलद गतीने व्हावे, संथ गतीने विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांचा वेळेत काम पूर्ण केल्याशिवाय पाठलाग सोडणार नाही, असा इशारा मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपालिकेत आयोजित आढावा बैठकीत दिला.
मालवण नगरपालिकेत शहरातील विकासकामांबाबतची आढावा बैठक आम. निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार उपास्थित होते.
यावेळी नगरपालिकेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहरांत सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीची व नवीन कामांच्या संकल्पनाबाबत माहिती देण्यात आली. रॉक गार्डनच्या विकासासाठी खडक रूपात सुशोभीकरण करणे, दगडी मुर्त्या उभारणे, गार्डनमधील पायवाटेचे सुशोभीकरण तसेच पर्यटकांचे आकर्षण ठरतील असे देखावे उभे करणे आदी संकल्पना यावेळी मांडण्यात आल्या. यावर आम. निलेश राणे यांनी रॉक गार्डनमध्ये चांगल्या व करता येण्याजोग्या कामांचा आराखडा बनवावा अशा सूचना दिल्या. तसेच मालवण शहरात राजकोट ते बंदर जेटी अशी झिप लाईन उभारणे, नाट्यगृह दुरुस्ती व मल्टीप्लेक्स उभारणी यां विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रशासनाने मालवण नगरपालिकेच्या आवारात उभारलेल्या अद्यावत अशा अग्निशमन केंद्र व अधिकारी कर्मचारी निवासस्थान इमारतीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. यावर आम. राणे यांनी लवकरच यां केंद्राच्या उदघाटनाची तारीख ठरविण्याची सूचना प्रशासनाला केली. तसेच मालवण नगरपालिकेने कुत्रे निर्बीजीकरण मोहीम राबवून ३०० भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याची माहिती देण्यात आली. मात्र हा निर्बीजीकरणाचा आकडा कमी असून मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संबंधित एजन्सी कडून ही मोहीम मोठ्या प्रमाणात आणि वर्षभर राबविण्यात यावी, यासाठी आवश्यक निधी आपण आमदार फंडातून देऊ असे आम. राणे यांनी सांगितले. तसेच नगरपालिकेने ३१ मोकाट गुरे पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवले, त्यापैकी २१ गुरे संबंधित मालक घेऊन गेले अशी माहिती देण्या आली, कोंडवाड्यासाठी किती निधी लागेल तो देऊ असे यावेळी आम. राणे म्हणाले. तसेच पावसाळ्यापूर्वी मालवण शहरातील गटार व व्हाळी यांची साफसफाई करण्यात येत ७ जून पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यावर आम. निलेश राणे यांनी मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता असल्याने या कामाची मुदत १ जून पर्यंत करून जलद गतीने काम करावे, त्यासाठी लागणारे कामगार वाढवावेत, अशा सूचना दिल्या.
नळपाणी योजनेच्या संथ कामावर आमदारांची नाराजी
यावेळी धामापूर ते मालवण या सुधारित नळपाणी योजनेच्या सुरु असलेल्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराने माहिती दिली. मात्र हे काम संथ गतीने सुरु असल्याचे आपल्या निदर्शनास आले असल्याचे आम. निलेश राणे यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी या कामाचा प्रगती अहवाल ठेकेदाराकडून दिला जात नाही, योजनेबाबतच्या बैठकांना ठेकदार उपस्थित राहत नाही अशा तक्रारी आमदारांसमोर मांडल्या. यावर आम. राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नळपाणी योजनेचे काम संथपणे सुरु असल्याचे मी ऐकून घेणार नाही, काम करणार कि नाही ते आताच सांगा, काम जलद गतीने झाले पाहिजे, वेळेत काम पूर्ण झाल्याशिवाय मी पाठलाग सोडणार नाही, असे खडेबोल संबंधित ठेकेदाराला सुनावले. तसेच ठेकेदाराच्या कामाच्या बाबतीत असलेल्या तांत्रिक अडचणी, नगरपालिकेच्या असलेल्या अडचणी याबाबत दोघांनीही एकत्र बसून मार्ग काढावा अशी सूचना केली. महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी मोठा निधी मिळत आहे, त्याचे चांगले नियोजन व्हावे यासाठीच आपला पाठपुरावा आहे असेही आम. राणे यांनी सांगितले