*कोंकण एक्सप्रेस*
*डाॅ. आंबेडकर स्मारक व संशोधन केंद्र उभारणीच्या कार्यास हातभार लावावा*
*आंनदराज आंबेडकर यांचे आवाहन ः कणकवलीत परिवर्तन दिन व सिंपन पुरस्कार वितरण सोहळा*
कणकवली ः प्रतिनिधी*
१९३८ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जानवली येथे महार परिषद घेतली होती. या परिषदेमुळे कोकणात सामाजिक परिवर्तन घडून आले. या एेतिहासिक परिषदेच्या स्मृती जतन ठेवण्यासाठी सिंपन प्रतिष्ठान दरवर्षी १४ मे रोजी परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करीत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. सिंपन प्रतिष्ठान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहे. सध्या काळ हा मार्केटिंगचा असल्याने सिंपन प्रतिष्ठाने आपल्या कार्याचे मार्केटिंग केले पाहिजे. याकरिता सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. सिंपन प्रतिष्ठानने जानवली येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारणीचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या या कार्यास बहुजन समाजाने हातभार लावावा, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अानंदराज आंबेडकर यांनी केले.
सिंपन प्रतिष्ठान, मुंबईतर्फे येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. आंबेडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे, ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे, प्रतिष्ठानचे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. आंबेडकर म्हणाले, १४ मे १९३८ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कणकवली तालुक्यातील जानवली भागाला पदस्पर्श झाला. त्यांचा आगमनाने, अमृतवाणीने अवघ्या बहुजन समाजाचा नवी संजीवनी मिळाली. या परिषदेने दलित, बहुजनांना ताठ मानेने जगण्याचे जणू भीमबळ प्राप्त झाले. या एेतिहासिक परिषदेच्या स्मृती जतन जपण्यासाठी सिंपन प्रतिष्ठान दरवर्षी १४ मे रोजी परिवर्तन दिन साजरा करीत आहेत. सिंपनचे हे कार्य मौलिक आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार व विचार महान आहे. मात्र, आजच्या युवा पिढीला बाबासाहेबांचे आचार व विचार आत्मसात करण्यासाठी परिवर्तन चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. सिंपन प्रतिष्ठानने जानवली येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या कामाला बहुजन समाज व आंबेडकर यांच्या अनुयायांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करताना सिंपन प्रतिष्ठान डाॅ. बाबासाहेबांचे विचार तळगाळापर्यंत रुजविण्याचे काम करीत असल्याबद्दल त्यांनी सिंपन प्रतिष्ठानचे कौतुक केले.
उत्तम कांबळे म्हणाले, सांस्कृतिक चळवळी उदध्वस्त करण्याचे काम केंद्रातील सत्ताधारी व सनातनी विचासरणीच्या संघटनांकडून पद्धतशीपणे सुरू आहे. हा धोका बहुजनांनी वेळीची आेळखला पाहिजे. त्यांच्या कृतीला प्रतिकार केला पाहिजे. सांस्कृतिक चळवळींमध्ये क्रांती करण्याची क्षमता असते. देशातील सांस्कृतिक चळवळींचे असित्व आबाधित राखण्याचे काम परिवर्तन चळवळीत काम करणाऱ्या मंडळींनी केले पाहिजे. सांस्कृतिक चळवळींचे असित्व नष्ट करणे हा राजकीय पक्षांचा डाव आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. कारण राजकीय पक्षांना सांस्कृतिक चळवळी आव्हान देऊ शकतात, हे त्यांना पक्के माहित आहे. अलीकडच्या काळाच सांस्कृतिक चळवळी थंडवल्याच्या दिसून येत, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. हा धोका वेळीच आेळखून सांस्कृतिक चळवळींना ब्रेक लागणार नाही, यासाठी ही चळवळ नष्ट करणाऱ्यांचा प्रतिकार केला पाहिजे. सिंपन प्रतिष्ठान कोकणात सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी काम करीत आहे. त्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगून कार्यक्रमाला असलेल्या कमी उपस्थितीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात अनिल तांबे यांनी सिंपन प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जानवली येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संशोधन केंद्र उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्मृतीशेष प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सिंपन जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक उत्तम कांबळे, स्मृतीशेष प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंपन विजयी भव पुरस्कार निवेदक, अभिनेता, व्याख्याता निलेश पवार यांना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिंपन अमृत पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक तथा समाजसेवक भास्कर तांबे, ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक मिठबावकर, कवी तथा सामाजिक कार्यकर्ते जनीकुमार कांबळे यांना आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सिंपन सन्मान पुरस्कार डाॅ.सतीश पवार, डाॅ. सुयश डिकवलकर यांना आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारकर्त्यांनी मनगोत व्यक्त करताना सिंपन प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ख्यातनाम चित्रकार नामानंद मोडक, संदीप कदम यांचे कुटुंबीय, जयप्रकाश कदम, अशोक कदम, ॲड. वाय. डी. सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. तर, दिवंगत अनिल कृष्णा कदम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार वैशाली जाधव यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोषाध्यक्ष दत्ता पवार, उपाध्यक्ष सत्यविजय तांबे, लक्ष्मण चौकेकर, चिटणीस अजित धामापूरकर, डॉ. श्रीकांत धारपवार, अशोक कांबळे, ॲड. वर्षा जाधव, दिलीप साळसकर, संजय धारपवार, मिलिंद चिंचवलकर, महेंद्र जाधव, सुनील जाधव, वैशाली यादव यांनी मेहनत घेतली.