*कोंकण एक्सप्रेस*
*योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान केला पाहिजे : जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर*
*भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा*
*सिंधुदुर्ग (तळेरे)*
योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान आणि गौरव केला पाहिजे. शिवाय, केलेले उपकार न विसरता त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे. त्याच जाणिवेने भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे कदमवाडीचे काम विजय कदम आणि सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले. ते कासार्डे कदमवाडी येथील भारतीय बौद्ध महाभेने आयोजित केलेल्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर, शाखा अध्यक्ष विजय कदम, ग्रामपंचायत सदस्य विजय राणे, संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर, ड्रामा ज्युनिअर फायनलिस्ट सावी मुद्राळे, प्रा. विनायक पाताडे, शाखा उपाध्यक्ष बबन तांबे, गोपाळ पांचाळ, समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव गुणाजी जाधव, संतोष कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते भिकाजी कदम, पोलिस पाटील योगेश कदम, वैभव मुद्राळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कासार्डे कदमवाडी येथील भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने दरवर्षी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यानिमित्त सकाळी 10 वाजता पंचशील ध्वजारोहण, त्यानंतर बुध्द पूजापाठ, 11.30 वा. धम्म प्रवचन आणि रात्रौ 9.30 वाजता अभिवादन सभा असे कार्यक्रम संपन्न झालेत.
रात्रौचा अभिवादनाचा कार्यक्रम विजय भिकाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी विविध गुणवंत मुलांचा गौरव, कासार्डे दाबगाव चे पोलिस पाटील योगेश कदम, ड्रामा ज्युनिअर फायनलिस्ट सावी मुद्राळे, शोभा कासले, ॲड. चैतन्या तांबे यांना शाल, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
निकेत पावसकर यांना विशेष पुरस्कार (चौकट)
मुळचे साळीस्ते येथील असलेले आणि संदेश पत्र संग्राहक म्हणून राज्यभर परिचित असलेले निकेत पावसकर यांना भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे च्या वतीने देण्यात येणारा विशेष पुरस्कार आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि भारतीय संविधान देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना निकेत पावसकर म्हणाले की, आम्ही करत असलेल्या या आगळ्यावेगळ्या चळवळीची नोंद आपल्या माणसांकडून घेण्यात आली, ही समाधानाची बाब आहे. या संग्रहाचा आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलात तर निश्चितच सांस्कृतिक आणि वैचारिक समृद्ध होऊ शकाल. या संग्रहाच्या द्वारे आम्ही मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहोत. शालेय मुलांनी वेगळी वाट अनुभवावी, आपल्यातील वेगळेपण कायम टिकू द्यावे, यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी या संदेश पत्रांची प्रदर्शने आयोजित केली जातात.
यावेळी सावी मुद्राळे हिनेही मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन योगेश कदम यांनी तर आभार विजय कदम यांनी मानले. या कार्यक्रमानंतर मायंडेश्वर दशावतार नाट्य मंडळ भडगाव यांचे दैवचक्र (काल्पनिक नाटक) सादर झाले.