“राजीनामा दिलेल्या जि.प. सदस्यांना पदे नाकारून राणेंनी त्यांची पत दाखवून दिली”

“राजीनामा दिलेल्या जि.प. सदस्यांना पदे नाकारून राणेंनी त्यांची पत दाखवून दिली”

*कोकण Express*

*”राजीनामा दिलेल्या जि.प. सदस्यांना पदे नाकारून राणेंनी त्यांची पत दाखवून दिली”*

*”राणे मूळ भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत देत नाहीत”*

*संदेश पारकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवरून नाराज असलेले मूळ8 भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर कासार्डे मतदारसंघाचे जि.प. सदस्य संजय देसाई यांनी राजीनामा दिला. भाजपचे हे जि.प.सदस्य भाजपचे निष्ठावंत असूनही त्यांना पदे नाकारून केवळ एक सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी यांना पुन्हा संधी देण्यात आली.
नारायण राणेंच्या दृष्टीने राजेंद्र म्हापसेकर, संजय देसाई व भाजपच्या इतर मूळ सदस्यांची कुवत नसल्याने त्यांना पदे नाकारून इतरांना संधी देण्यात आली. त्यामुळे राणे मूळ भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत देत नाहीत हे राणे कुटूंबियांनी दाखवून दिले आहे. अशी भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांची कानउघडणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे.
माझ्या अनुभवानुसार नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा वापर केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कुटूंबियांच्या फायद्यासाठीच त्यांनी करून घेतला. मूळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाही अशाच प्रकारे राणे वापर करून घेत आहेत.
राजेंद्र म्हापसेकर, संजय देसाई यांनी पक्षासाठी दिलेले योगदान राणेंनी क्षणार्धात विसरून आपल्याच समर्थकांना पदे मिळवून दिली. सिंधुदुर्ग मधील मूळ भाजप हि राणे-भाजप होत आहे असे विधान याअगोदर आपण केले होते. ते विधान सत्यात उतरताना दिसत आहे. राणे समर्थकांच्या भाजप पक्षातील हस्तक्षेपामुळे भाजपचे मूळ निष्ठावंत कार्यकर्ते दूर फेकले गेले आहेत.
राणेंच्या अस्तित्वहिन झालेल्या स्वाभिमान पक्षाला भाजपने आपल्यात सामील करुन घेतले आणि स्वतः खासदारकी मिळवली आणि मुलाला आमदारकी मिळवून दिली. मात्र याची परतफेड म्हणुन जि.प. अध्यक्ष व सभापती निवडित राणेंनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून केली. यामुळे मुळ भाजप कार्यकर्ता दुखावला गेला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडीत राणेंना भाजपच्या मूळ सदस्यांना संधी देण्याच्या सुचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या होत्या. मात्र आयत्यावेळी राणेंनी वरिष्ठांचा सुचनांना केराची टोपली दाखवून भाजपच्या मूळ निष्ठावंत जि.प. सदस्यांना पदे नाकारून आपल्या मर्जीतील धनदांडग्या कार्यकर्त्यांनाच बढती दिली. म्हणून आज भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली आहे.
राणेंच्या भाजपची जि.प. वरील ठेकेदारी आणि मक्तेदारी पुढील सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत मोडीत काढून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार आहोत असा ठाम विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!