*कोंकण एक्सप्रेस*
*महाराजस्व समाधान शिबिर अभियानात १२३ दाखल्यांचे वितरण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियाना दरम्यान, सुमारे १२३ दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल सेवक, मंडळातील सर्व पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस, कृषी विभागाचे प्रतिनिधी, महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रतिनिधी, महा ई सेवा केंद्राचे प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, सेतू सुविधा केंद्राचे प्रतिनिधी, आधार सेवा केंद्राचे प्रतिनिधी तसेच उभादांडा, अणसूर, मोचेमाड व परबवाडा येथील सरपंच, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्षांसह वेंगुर्ला मंडळातील एकूण १४७ लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. या अभियानात वितरीत करण्यात आलेल्या दाखल्यांमध्ये एक वर्षातील ३८ उत्पन्नाचे दाखले, तीन वर्षांचे ११ उत्पन्न दाखले, ३ वय अधिवास दाखले, ज्येष्ठ नागरीक ओळखपत्र, स्थानिक वास्तव्य दाखला एक, १० जातीचे दाखले, १० रेशनकार्ड, २१ सातबारा, कातकरी समाजाचे २८ सातबारा आदींचा समावेश आहे.
आडारी ग्राम महसूल अधिकारी निखिल सोनवडेकर यांनी अॅग्रीस्टॅक योजनेबाबत, मठ ग्राम महसूल अधिकारी दिनेश गाभूड यांनी ई हक्क प्रणालीबाबत तर मोचेमाड ग्राम महसूल अधिकारी दर्शन बोरकर यांनी ई पिक पहाणी प्रणालीबाबत, श्रीम. सामंत यांनी महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजनांची, जीवन परब यांनी कृषी विभागाच्या योजनांची तसेच आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींनी आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजनांची माहिती दिली.