सिंधुदुर्गात सीपीएए तर्फे सलग तीन दिवस आरोग्य शिबिरे २ मे रोजी कुणकेश्वर आरोग्य शिबिर

सिंधुदुर्गात सीपीएए तर्फे सलग तीन दिवस आरोग्य शिबिरे २ मे रोजी कुणकेश्वर आरोग्य शिबिर

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गात सीपीएए तर्फे सलग तीन दिवस आरोग्य शिबिरे
२ मे रोजी कुणकेश्वर आरोग्य शिबिर*

*जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ राहणार उपस्थित*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१७ सालापासून दरवर्षी सातत्याने निरनिराळ्या ठिकाणी गरजवंत रुग्णांसाठी सीपीएए आरोग्य शिबिरे आयोजित करत आलेली आहे. सिंधुदुर्गात मे महिन्याच्या २ तारखेला कुणकेश्वर येथे, ३ तारखेला दोडामार्ग येथे तर ४ तारखेला तुळस येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जनरल सर्जन डॉ सतीश काणेकर, कान नाक घसा तज्ञ डॉ संजय घिल्डियाल, फिजिशियन डॉ. वीणा बोरकर व स्त्रीरोग तज्ञ डॉ रचना मेहरा सहभागी होणार आहेत. तसेच रुग्ण समुपदेशक म्हणून सीपीएएच्या कार्यकारी संचालिका श्रीमती नीता मोरे व सहसंचालिका श्रीमती मीनल परब सहभागी असणार आहेत.
१९६९ सालात मुंबईत स्थापन झालेली ही संस्था आता हिरकमहोत्सवी वाटचाल करीत आहे. मुंबईतील महालक्ष्मी येथे मुख्यालय असलेली सीपीएए कर्करोगावर अत्यंत मूलभूत आणि व्यापक काम असलेली संस्था म्हणून प्रचलित असून ह्या शिबिराच्या माध्यमातून केवळ कर्करोग नव्हे तर जनरल सर्जरी, कान नाक घसा, फिजिशियन, स्त्रीरोग अश्या विविध शाखांचे डॉक्टर शिबिरात भाग घेत असतात.
रुग्णांच्या तज्ञांकडून तपासणी सोबत शिबिरात प्राथमिक रक्त तपास तसेच गर्भपिशवीच्या मुखाची पॅप स्मीयर तपासणी केली जाणार आहे. तसेच पुढील कुठल्याही स्वरूपाची आवश्यक रेडियोलॉजिकल तपासणी मुंबईत विनामूल्य तत्वावर केली जाणार आहे. सदरील आरोग्य शिबिरे कुणकेश्वर येथे कुणकेश्वर देवस्थान समिती , दोडामार्ग येथे मा. नगराध्यक्ष श्री चेतन चव्हाण तर तुळस येथे वेताळ प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने व सहभागाने आयोजित केलेली असून ह्या शिबिरांमध्ये रुग्ण तपासणी करिता येणारा खर्च सिंधुदुर्गाची नाळ असलेल्या डॉ शुभा मौदगल आणि श्रीमती दीपा संघल यांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ प्रदान केला आहे तसेच या शिबिराच्या पुण्य कार्यासाठी मुंबईतील शमीराज ट्रस्ट ने मोलाचा वाटा उचललेला आहे. सर्व शिबिरांना कणकवली येथील डॉ विद्याधर तायशेट्ये यांच्या संजीवनी रुग्णालयाचे सुद्धा सहकार्य लाभलेले आहे. तरी ह्या आरोग्य महायज्ञाचा गरजवंतांनी योग्यतो लाभ घ्यावा जेणेकरून समाजातील हा घटक सुद्धा आरोग्याच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!