*कोंकण एक्सप्रेस*
*आडाळी एमआयडीसी हद्दीत बेकायदेशीर मायनिंग उत्खनन*
* आर्थिक व्यवहारातून स्थानिक युवकाला मारहाण*
* भाजप पक्ष स्थानिकांसोबत महेश सारंग*
* दोडामार्ग ः शुभम गवस*
तालुक्यातील आडाळी एमआयडीसीत गेले कित्येक महिने जमीन सपाटीकरण करण्याच्या नावाखाली गोवा व जिल्ह्याभरातील खनिज तस्करी करणारे दलाल दादागिरी करून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र महसूल विभागाच्या आशीर्वादाने खनिज तस्करी करीत आहेत. आडाळी खनिज तस्करीवर कारवाई न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिला आहे.
आडाळी एमआयडीसीत एमआयडीसीची जमीन सपाटीकरण करण्याच्या नावाखाली गेले कित्येक महिने गोवा राज्यातील दलाल काही स्थानिकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात मायनिंग काढून बिनधास्त पणे रेडी येथे वाहतूक करीत आहेत. बाहेरील गुंड प्रवृत्तीचे दलाल स्थानिकांना मारहाण करून हजारो डंपर मायनिंगची माती खुलेआम वाहतूक करीत आहेत. या अगोदरही आडाळी एमआयडीसीमधील जमीन सपाटी करणाखाली मायनिंग उत्खनन करून शासनाचा लखो रुपयांचा महसूल बुडून लाखो रुपये या बाहेरील गुंड प्रवृतीच्या युवकांनी कमावले आहेत.
आज आडाळी गावात उत्खनना-साठी बाहेरून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांची मायनिंग उत्खननाच्या आर्थिक व्यवहारातून स्थानिक युवकांना झालेल्या मारहाणीमुळे आडाळी गावात दहशत निर्माण झाली आहे. अशा गुंड प्रवृत्ती जर बळावत गेल्या तर दोडामार्ग बीड कधी होईल हे कळणार सुद्धा नाही. त्यामुळे संबंधित पोलीस यंत्रणा आणि महसूल विभागाने तात्काळ या गुंडांचा छडा लावावा आणि योग्य कार्यवाही करावी. जर गावात येऊन कोण दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजप पक्ष कधीही मप्य चसणार नाही, असा इशारा महेश सारंग यांनी दिला आहे.