*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला व्हिजन २०४७‘ निबंध स्पर्धेचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला नगरपरिषद २५ मे २०२५ रोजी आपला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा करीत आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक, असा लौकिक असलेली ही नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. वेंगुर्ला शहराने स्वच्छतेमध्ये सातत्याने अव्वल क्रमांक मिळवला आहे. यामागे प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच जागरूक आणि सहकार्यशील नागरिक यांचे मोठे योगदान आहे.
आपण भारतवासीय २०४७ साली स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करणार आहोत. त्याचप्रमाणे, वेंगुर्ला नगरपरिषदेचाही शतकोत्तर अमृत महोत्सवी टप्पा जवळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहराचे भविष्यकालीन व्हिजन काय असावे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्ताने ‘वेंगुर्ला व्हिजन २०४७ – शहर विकासात वेंगुर्ला नगरपरिषदेकडून अपेक्षा आणि माझे योगदान‘ या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी खुली असून, वेंगुर्ला शहरावर प्रेम करणारा कोणतीही व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. निबंध ५०० शब्दांच्या मर्यादेत असावा. स्पर्धकांनी आपले निबंध १५ मे २०२५ पूर्वी
मुख्याधिकारी, नगरपरिषद, वेंगुर्ला (लिफाफ्यावर व्हिजन २०४७ निबंध स्पर्धा असे स्पष्ट नमूद करावे.) या पत्त्यावर किवा covengurle@gmail.com या ई-मेलद्वारे (युनिकोड फॉन्टमध्ये टाईप करून पाठवावा) स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना ५ हजार, ३ हजार, २ हजार तसेच उत्तेजनार्थ १ हजार रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व व्हिजनरी नागरिक, विद्यार्थी, गृहिणी अशा सर्वांनी आपले विचार आणि स्वप्ने मांडावीत, जेणेकरून वेंगुर्ल्याचा विकास लोकसहभागातून अधिक गतिमान होईल, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.