*कोंकण एक्सप्रेस*
*प्रकाश बिडवलकर सहित अन्य सर्व संशयितांचे मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण, हत्या आणि मृतदेह विल्हेवाट प्रकरणी पोलिसांनी सर्व सहाही संशयित आरोपींसह महत्वाचा असा मृत प्रकाश बिडवलकर याचा मोबाईल मिळविण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी गणेश नार्वेकर वगळता उर्वरित पाचही संशयित आरोपीना आज कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीच्या अधीन राहून ५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशी माहिती तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे आणि कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील पोलीसांच्या तपासात महत्त्वाचा असलेला सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याचा मोबाईल अखेर पोलीसांच्या हाती लागला आहे. हा मोबाईल संशयित आरोपी क्रमांक एक सिध्देश शिरसाट याने मृत प्रकाश कडून काढून घेवून अमोल शिरसाट यांच्याकडे दिला होता. तो मोबाईल अमोल शिरसाट यांच्या कुडाळ येथील घरातून पोलिसांनी हस्तगत केला असुन त्या मोबाईलसह सर्व संशयितांचे ६ मोबाईल मिळुन एकुण ७मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच संशयित आरोपींच्या पोलीस कोठडीच्या काळात पोलिसांनी संशयित आरोपींच्या व्हॉइस सॅम्पलची तपासणी केली तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेले पेट्रोल आणि टायर याचा पंचनामा करण्यात आला.
प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील सिद्धेश शिरसाटसह पाचही संशयितांची पोलीस कोठडी मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी संपली. या सशयितांमध्ये सिद्धेश शिरसाट, अमोल शिरसाट, सर्वेश केरकर, अनिकेत गावडे, गौरव वराडकर या पाच जणांचा समावेश आहे. यातील गणेश नार्वेकर हा संशयित आधीच न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे या पाचही संशयितांना त्यांची पोलीस कोठडी अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी तपासी अधिकारी श्री. विनोद कांबळे यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना दि.५ में पर्यंत न्यायालयीन देण्यात आली.