*माध्यमिक शिक्षण विभागाचा अजब कारभार!…महिन्यात एक फाईल दोनदा गायब !!*

*माध्यमिक शिक्षण विभागाचा अजब कारभार!…महिन्यात एक फाईल दोनदा गायब !!*

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्यमिक शिक्षण विभागाचा अजब कारभार!*

*महिन्यात एक फाईल दोनदा गायब !!*

*शिक्षक भारती सहविचार सभेत पदाधिकाऱ्यांची तीव्र नाराजी :*

*१ मे पासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी व शिक्षक भारती सिंधुदुर्ग पदाधिका-यांची सहविचार सभा नुकतीच शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दालनात संपन्न झाली. या सभेत शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमण भुमिका मांडत’ यापुर्वी आम्ही फाईली शोधून देऊनही, अद्याप त्या फाईलवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी या कामाचे काय झाले? असा प्रश्न विचाराला असता यावर शिक्षणाधिकारी यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रकार केला. यावर संतप्त होत “आमच्या फाईली! आम्हाला दाखवा!! असा आग्रह संबंधित शिक्षकांनी धरताच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी संबंधित फाईल शोधण्यास सुरुवात केली. पण, सायं.५ वा शोध मोहीम सुरू करुनही सायं ७ पर्यंत एकही फाईल त्यांना सापडली नाही.यावरून कर्मचारी आणि शिक्षक भारती पदाधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. ‘फाईल जाणिवपूर्वक लपवल्या जात असल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला.
दरम्यान या सभेत आश्वासित प्रगती योजनेच्या कामाच्या संदर्भात शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी यांनी सभेला माहिती दिली.
प्रत्येक शाळेला चेकलिस्ट द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच संघटनांनी केलेली असताना अजूनही सर्व शाळांना चेक लिस्ट मिळालेली ती देण्यासाठी टाळाटाळ का होते? असा सवाल प्रदीप सावंत यांनी विचारला. यावर शिक्षणाधिकारी यांनी यापुढे सर्वच प्रस्ताव ऑनलाइन होणार आहेत असे उत्तर दिले.
यासभेत उंबर्डे हायस्कूल श्रीम.स्वरा पाटील शिक्षिका नियमित मान्यता प्रस्ताव, शिरगाव हायस्कूल श्री.हेमंत सावंत निवड वेतनश्रेणी प्रस्ताव, यावर सविस्तर चर्चा झाली.
चेकलिस्ट प्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव देऊनही पुन्हा पुन्हा त्रुटी का काढल्या जातात? असा संतप्त सवाल जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी उपस्थित केला. यावर समर्पक उत्तर शिक्षणाधिकारी देऊ शकल्या नाहीत.
फाईली न पाहता तृटी काढल्या जातात असा आरोप आकाश‌ पारकर यांनी यासभेत केला.
याशिवाय एन पी एस कटिंग संदर्भातील त्रुटी यासंदर्भातील काही संभ्रम असल्याचे शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.डी.एड, बीएड सेवाज्येष्ठता वादविवादावर योग्य तोडगा काढला जावा अशी मागणी संजय वेतुरेकर यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली,कोर्ट मॅटर असल्याने योग्य मार्गदर्शनाप्रमाणे निर्णय घेतला जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी सभेला दिली.याशिवाय टोपीवाला हायस्कूल मालवण अनुकंपा संदर्भात आणि तुळसुली हायस्कूल पगार प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली.
परिपूर्ण प्रस्ताव तसेच तृटी पुर्ण केलेले प्रस्ताव असतानाही मान्यता का मिळत नाही ?असा सवाल प्रदीप सावंत यांनी विचारला.

कार्यालयीन वेळेनंतर कोणीही अभ्यंगत शिक्षण विभागात येऊ नये

कार्यालयीन वेळेनंतर शिक्षण विभागाच्या कार्यालयात कोणीही अभ्यंगत येता कामा नये अशी सक्त सूचना शिक्षण उपसंचालक श्री. चोथे यांनी जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या सहविचार सभेत नुकतीच शिक्षण विभागाला दिली होती.तरीही असे प्रकार पून्हा सुरू असून एकाच व्यक्तीची फाईल एका महिन्यात कार्यालयातून दोनदा गायब होते हा अजबच प्रकार म्हणावा लागेल असे आश्चर्य रुपेश बांदेकर यांनी सभेत व्यक्त केले.

यापुढे सर्व प्रस्ताव ऑनलाईनच होणार…

या सभेत माहिती देताना शिक्षणाधिकारी श्री. शिंपी मॅडम यांनी यापुढचे बहुतेक सर्व प्रस्ताव कार्यालयात ऑफलाईन सादर करण्याची पध्दत बंद होणार असून सर्व प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याची पध्दत सुरू होणार असून, त्यावर काम सुरू आहे, काही दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी सभेला दिली.

नवीन संचमान्यतेनुसार बहुसंख्य शिक्षक अतिरिक्त होणार..

नवीन संचमान्यतेनुसार जिल्ह्यात विविध शाळेतील सुमारे ८४७ शिक्षक पदे अतिरिक्त होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांनी देऊन या शिक्षकांचे समायोजन कुठे करायचे? अशी चिंता ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिक्षक भारती संघटनेच्यावतीने शिक्षणाधिकारी यांना राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण यांनी निवेदन सादर केले.

विविध प्रस्तावांना तत्काळ मंजूरी मिळावी संघटनेची मागणी…

विविध न्यायालयीन आदेशानुसार सादर करण्यात आलेले प्रस्ताव,सन.२०२४/२५ प्रलंबित राहिलेले प्रस्ताव ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मेडिकल बीलांचे प्रस्ताव, मुख्याध्यापक,उपमुख्यापक,व पर्यवेक्षक पदांचे प्रस्ताव तसेच अनुकंपा तत्वावर आलेल्या प्रस्तावांना अग्रक्रमाने मंजूरी द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

सायंकाळी ४.३० वा सुरु झालेली सभा तब्बल दिड तास सुरू राहील पण, जोपर्यंत आमच्या फाईली मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून उठणार नाही असा आक्रमक पवित्र शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने कर्मचाऱ्यांना सायं.७ वा वाजेपर्यंत कार्यालयात थांबून राहावे लागले .पण कार्यालयातील या फायली गायब कोण? व कशासाठी करतो?.याची चर्चा मात्र जिल्हाभर सुरू आहे.
चौकट
कला शिक्षकांच्या अभिनंदनचा ठराव
दरम्यान शिक्षण विभागातील प्रत्येक कार्यालयात जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील ४७ कला शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करून सर्व भिंती बोलक्या केलेले आहेत त्याबद्दल शिक्षक भारतीच्यावतीने यासभेत सर्व कलाकार कला शिक्षकांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.
या सभेला महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे अध्यक्ष प्रशांत आडेलकर,सचिव समिर परब, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष जनार्दन शेळके, नारायण कोठावळे, रुपेश बांदेकर, सिद्धार्थ तांबे,महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण,संघटक आकाश पारकर, जिल्हा प्रसिद्ध विभाग प्रमुख दत्तात्रय मारकड,विविध शाळांचे मुख्याध्यापक सुशांत पाटील, उत्तम भागीत, तानाजी साळसकर,श्रीम-प्रणिता बांबुळकर, श्रीम. मनाली नाईक, तालुकाध्यक्ष हेमंत सावंत, स्वप्निल पाटील,अरुण गवस,शरद देसाई,संतोष राऊत ,सौ.शारदा गावडे,चंदन गोसावी, सुरेश केदार, रामचंद्र घावरे, परमेश्वर सावळे, डी. एस भोसले, श्रीम.रुपा कामत,श्रीम.दिप वारंग, सदाशिव सावंत, अरुण सावंत, रमेश गावडे, राजू जाधव, ताराचंद राठोड ,विद्याधर पिळणकर, बाळू पाटील, दयानंद बांगर,संदीप कोळापटे, साईनाथ झाडे, एस के.आडे, अनिकेत वेतुरेकर,गिरीश गोसावी,ज्ञानेश्वर सावंत,सागर फाळके श्रीम. विद्या शिरसाट व श्रीम. स्वरा पवार आदी शिक्षक भारती कार्यकर्ते शिलेदार उपस्थित होते.
सभेच्या शेवटी 30 तारखेपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अन्यथा नाईलाजाने शिक्षक भारतीला १ में रोजी पुन्हा बेमुदत धरणे आंदोलन सुरू करावे लागेल असा इशारा राज्य प्रमुखकार्यवाह संजय वेतुरेकर यांनी या सभेत दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!