*कोकण Express*
*भुईबावडा गावचे सुपुत्र, समाजसेवक सुनिल नारकर यांची भुईबावडा कॉलेजसाठी १ लाख रुपयांची देणगी….*
*समाजसेवक श्री. नारकर यांच्या कौतुकास्पद उपक्रमाबाबत सर्वच स्तरातून समाधान……*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
प्रत्येकाने समाजातील गरजू व्यक्तीला यथाशक्ति मदत करावी अशी शिकवण आपली संस्कृती देते. कोणतीही अपेक्षा न करता मदत करावी असा व्यापक विचार मांडणारी आपली भारतीय संस्कृती म्हणूनच गौरविली जाते. समाजातील काही संस्था, व्यक्ती जागरूकपणे कार्य करीत असतात आणि जाणीवपूर्वक सामाजिक बांधिलकी जोपण्याचा प्रयत्न करीत असतात. असच एक व्यक्तीमत्व म्हणजे भुईबावडा गावचे सुपुत्र समाजसेवक तसेच मुंबई येथील स्पर्शिका बिल्डर्सचे मालक सुनील नारकर यांनी येथील आदर्श विद्या मंदिर व तात्यासो ऊर्फ मो. स. मोरे कनिष्ठ महाविद्यालय भुईबावडा या प्रशालेला वाणिज्य शाखा सुरू ठेवण्यासाठी एक लाखाची देणगी दिली आहे. येथील आदर्श विद्या मंदिर व तात्यासो उर्फ मो. स. मोरे कनिष्ठ महाविद्यालय भुईबावडा या प्रशाला वाणिज्य शाखा सुरू ठेवण्यासाठी देणगी स्वरूपात एक लाखाचा धनादेश सरपंच बाजीराव मोरे यांच्यामार्फत सुपूर्त केला.
रयत शिक्षण संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या भुईबावडा येथील शाखेत विनाअनुदानित वाणिज्य शाखा सुरू ठेवण्यासाठी गेले अनेक वर्ष कर्तव्य फाऊडेशन या माजी विद्यार्थी संघटनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. वाणिज्य शाखा चालू ठेवण्यासाठी शिक्षकांचा पगार कर्तव्य फाऊंडेशन यांच्यामार्फत सुरू आहे. परंतु कोरोना काळात समाजातील सर्व घटकांची आर्थिक घडी कोलमडल्याने याचा मोठा आर्थिक भार कर्तव्य फाऊडेशन या संस्थेवर पडला होता. येथील समाजसेवक तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी सुनील नारकर यांनी मोठा आर्थिक हातभार प्रशालेला दिला आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत ग्रामस्थांमधून तसेच माजी विद्यार्थी संघटना कर्तव्य फाऊडेशन यांच्यावतीने आभार व्यक्त केले जात आहे.
याबाबत देणगीदार सुनील नारकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आज मी जो घडलो आहे आहे ते माझ्या शाळेमुळेच आहे. यापुढे देखील आवश्यक तेथे सहकार्य केले जाईल. शाळेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतप्रती असलेले प्रेम सर्वांनी संघटीत होऊन दाखवले पाहिजे. फाऊडेशन या माजी विद्यार्थी संघटनेने यापुढे असेच एकत्र राहून शाळेच्या विकासासाठी झटले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे यांनी श्री नारकर यांचा एक लाखाचा चेक प्रशालेचे मुख्याध्यापक नामदेव चव्हाण, ए. एम. माने यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
प्रशालेच्या उन्नतीसाठी सर्वांनी असेच पुढे आले पाहिजे. मागील वर्षी कर्तव्य फाउंडेशन च्या वतीने शाळा डिजिटल करण्यात आली आहे. असेच उपक्रम राबविण्यासाठी देणगीदारांनी पुढे यावे असे आवाहन कर्तव्य फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष मोरे खजिनदार प्रकाश मोरे यांनी केले आहे.
