*कोंकण एक्सप्रेस*
*सुमारे ३०० वर्षांनी मिठबाव रामेश्वराच्या वार्षिक उत्सवास मिळाली नवसंजीवनी*
*हनुमान जन्मोत्सवाने झाली यावर्षीच्या वार्षिक उत्सवाची सांगता*
*मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तीन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरात आज शनिवारी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.सुमारे ३०० वर्षांनंतर शिवकळेच्या आदेशाने मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिराच्या वार्षिक उत्सवास पुन्हा नवसंजीवनी मिळाली आणि मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. या वार्षिक उत्सव मालिकेतील हा एक महत्त्वाचा ठरला तो चैत्र मासातील शिव विष्णूचा नवरात्र उत्सव सोहळा. होळी पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि जवळपास एक महिना चालतो.
होळी ते पौर्णिमा एक महिन्याचा वार्षिक उत्सव, गुढीपाडवा ते रामनवमी चैत्र नवरात्र, एकादशी दिवशी लळीत कीर्तनाने नवरात्र सांगता, या उत्सव कालावधीत पुराणवाचन, कीर्तन, गायन,पालखी गायन प्रदक्षिणा असे विविध कार्यक्रम मंदिर परिसरात आयोजित केले होते.
आज हनुमान जयंती निमित्त सकाळी पहाटे ५:३० वाजता कोटकामते येथील ह.भ.प. कमलाकर पाटकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर सूर्योदयानंतर हनुमान जन्मोत्सव पार पडला.त्यानंतर ६:४० वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.”प्रभू श्री रामचंद्र की जय” आणि “जय हनुमान की जय” ” अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एकमुखाने बोला जय जय हनुमान” या जयघोषात मिरवणूक निघाली.
हनुमान स्तोत्राचे पठणही भाविकांनी एकत्र येत केले. या उत्सवासाठी तिन्ही गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मंदिर समितीने सर्व देवसेवक, मानकरी आणि गावकरी यांचे आभार व्यक्त केले .