संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना कलारत्न पुरस्कार जाहीर

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना कलारत्न पुरस्कार जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना कलारत्न पुरस्कार जाहीर*

*18 एप्रिलला मुंबई येथे भव्य कार्यक्रमात होणार प्रदान*

*कासार्डे ः संजय भोसले*

बदलापूर येथून गेल्या ३० वर्षापासून प्रसिद्ध होणाऱ्या लोकप्रिय उल्हास प्रभात न्युज पेपर व उल्हास प्रभात न्यूज चॅनेल तर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यातील कलारत्न पुरस्कार 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र संग्रहाच्या चळवळीसाठी जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 18 एप्रिल रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.

निकेत पावसकर गेली 19 वर्षे संदेश पत्रांचा आगळावेगळा संग्रह करीत आहेत. ही चळवळ स्वतः पुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही विविध ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगळी प्रेरणाही मिळत आहे. तर जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून लेखनाची आवड पुन्हा मुलांमध्ये रुजविण्याचे काम गेली चार वर्षे सातत्याने केले जात आहे.

या संग्रहात देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील भारतीय पोस्ट कार्डवर संदेश पत्रे त्यांच्या संग्रही आहेत. यामध्ये 1700 पेक्षा जास्त संदेश पत्रे असून त्याबद्दल सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून तीनवेळा तर सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरून दोनवेळा मुलाखत प्रसिध्द झाली आहे. तर राज्यातील विविध वृत्तपत्रात त्यांच्या या संग्रहाचा गौरव करण्यात आलेला आहे. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम वरही त्यांच्या या चळवळीचा गौरव करण्यात आलेला आहे.

या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहाबद्दल कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टकडून देण्यात येणारा अक्षरघर संकल्पक पुरस्कार 2023 तसेच रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टकडून देण्यात येणारा कार्यगौरव पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले आहे. हा जाहीर झालेला कलारत्न पुरस्कार 2025 आमदार किसन कथोरे, दैनिक सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव आणि उल्हास प्रभात न्युज पेपर चे संपादक डॉ. गुरुनाथ बनोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्काराबद्दल पावसकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

*संदेश पत्र पोस्ट कार्डवरच का?*
या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. तसेच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने आणि आपली काहितरी वेगळी खासियत असावी यासाठी संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जातात.

*अक्षरघराला यांनी दिली भेट*

तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, प्रसिध्द नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे, पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

*या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात*
निकेतच्या या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!