*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यार्थ्यांच्या आठवडा बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद*
*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*
खेळाच्या निमित्ताने गजबजणा-या मैदानावर सोमवारी भरलेला विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार लक्षवेधी ठरला. विद्यार्थी विक्रीस ठेवलेल्या आपापल्या उत्पादनांची मोठमोठ्याने जाहिरात करीत होते. त्यांच्या या उपक्रमाला पालकांसोबतच नागरिकांनीही प्रोत्साहन देत बाजारहाट खरेदी केला.
वेंगुर्ला शाळा नं.१तर्फे ७ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला सर्वस्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आठवडा बाजाराचे उद्घाटन आसोली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रमण किनळेकर यांच्या हस्ते व वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कार्यालयील अधिक्षक संगीता कुबल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, उपाध्यक्ष राकेश सापळे, पत्रकार संजय पिळणकर, श्रीनिवास सौदागर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, सदस्य स्नेहल बागडे, सौ.तेजल तारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या आठवडा बाजारात विद्यार्थ्यांनी पूजा साहित्य, भाजीपाला, नाश्ता, आंबे, भेळ अशाप्रकारची उत्पादने विक्रीस ठेवली होती. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करीत विद्यार्थ्यांच्या उपक्रमास प्रतिसाद दर्शविला.
या उपक्रमाला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी कोनकर, केंद्रप्रमुख महादेव आव्हाड, वेंगुर्ला पंचायत समितीच्या शिक्षण विभागमधील समग्र शिक्षा अंतर्गत विषयतज्ज्ञ शिवानी आळवे, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांच्यासह वेंगुर्ला हायस्कूल, पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला शाळा नं.४च्या शिक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.