*कोंकण एक्सप्रेस*
*दहिबांव अन्नपूर्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी ९.५० कोटींचा निधी मंजूर*
*पालकमंत्री नीतेश राणेंनी देवगडच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
दहिबांव येथील अन्नपूर्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे ९.५० कोटी रुपयांचा निधी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी मंजूर केला आहे. ही योजना देवगड व जामसंडे या गावांना पाणीपुरवठा करत असल्याने आता देवगड-जामसंडे नळपाणी योजनेस नवसंजीवनी मिळणार आहे.
देवगड-जामसंडे परिसरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता. पालकमंत्री या नात्याने नितेश राणे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातले होते. यापूर्वीच या योजनेस साडेनऊ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळवून दिली होती; मात्र प्रशासकीय मान्यता बाकी होती. विशेष बाब म्हणून, “वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी नगर परिषदांना निधी” या शिर्षकाखाली हे पैसे मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत खराब झालेली पाईपलाइन, पंप, तसेच उद्धभवावरील विहिरीची दुरुस्ती यासारखी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत.
यामुळे देवगडचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. कोर्ले-सातंडी धरणावरून देवगडसाठी नवी पाणी योजना प्रस्तावित आहे. मात्र ती योजना पूर्ण होईपर्यंत, दहिबाव अन्नपूर्णा योजना सुस्थितीत ठेवण्याचे काम या आर्थिक तरतुदीमुळे शक्य होणार आहे.