*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाटत श्री साई मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन*
*फोंडाघाट : गणेश इस्वलकर*
फोंडाघाट हवेलीनगर येथे असलेल्या श्री साई मंदिरात येत्या ६ एप्रिल २०२५ रोजी रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे.
या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.०० वाजता काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता पालखी मिरवणूक आणि दुपारी १२.३५ वाजता श्री राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे रात्री १०.०० वाजता होणारा ‘नृत्य नजराणा २०२५’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित नृत्यकलाकार आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकणार आहेत.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री साई शैक्षणिक व सामाजिक सेवा मंडळ, हवेली नगर फोंडाघाट यांनी पुढाकार घेतला आहे. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी संस्था अध्यक्ष श्री सुभाष मर्ये यांनी केले आहे.