*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला तालुक्यासह शहरात पावसाची हजेरी*
*खंडित विजपुरवठ्यामुळे नागरिकांमधून नाराजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*
सिधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वळीवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवार दि. ३ एप्रिलच्या पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह वेंगुर्ला तालुक्यासह शहरात हजेरी लावली. त्यामुळे पहाटे काहीकाळ वातावरणात गारठा निर्माण झाला असला तरी त्यानंतर मात्र, नागरिकांना उष्म्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले.
*खंडित विजपुरवठ्यामुळे नागरिकांमधून नाराजी*
वेंगुर्ला शहरात गुरूवारी मध्यरात्रीपासून अधूनमधून होत असलेल्या खंडित विजपुरवठ्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सध्याचे दिवस हे कडक उन्हाळ्याचे आहे. त्यामुळे विज पुरवठा खंडित झाल्यास होणा-या उष्म्याच्या त्रासाने नागरिक हतबल होत आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री दीडच्या सुमारास विज पुरवठा खंडित झाला. प्रचंड उष्म्याने नागरिकांची झोपमोड झाली. या प्रकाराने महाराष्ट्र विज पुरवठा मंडळाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुमारे एक ते सव्वा तासाच्या अंतराने विज पुरवठा सुरळीत झाला. शुक्रवारी सकाळच्या सत्रातही विजेचा लपंडाव सुरू राहिल्याने ब-याच कार्यालयीन आणि खाजगी कामकाजात अडथळा निर्माण झाला. विज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार तालुक्यातील काही ग्रामीण भागामध्येही घडला असल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.