*कोंकण एक्सप्रेस*
*पाणबुडीचा गुलदार प्रकल्प कुणकेश्वर समुद्रातच व्हावा*
*देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार समुद्रात स्थापित करुन पाणबुडी प्रकल्प राबविण्याची संकल्पना अनेक वर्षांची होती. हा प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प असुन पर्यटनास महत्वाचा ठरणार आहे. हा अंडरवॉटर म्युझियम अॅन्ड आर्टिफिशिअल रीफ आणि पाणबुडीचा गुलदार प्रकल्प कुणकेश्वर समुद्रात होण्यासाठी येथील समुद्र खोली व भौतिक परिस्थितीचा विचार करता अनुकुल असल्याचे समजते. त्यामुळे हा प्रकल्प कुणकेश्वर येथेच व्हावा, अशी मागणी देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीच्या वतीने राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मालवण, वेंगुर्ला येथे अनेक पर्यटन प्रकल्प आहेत व या ठिकाणी पर्यटनदृष्ट्या चालना मिळाली आहे. मात्र कुणकेश्वर-देवगड या ठिकाणी पर्यटन वाढीस अजुन चालना मिळण्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी झाल्यास उपयुक्त ठरेल. तरी आपण याकडे विशेष लक्ष देवुन हा पर्यटन प्रकल्प मौजे कुणकेश्वर समुद्रात व्हावा. या करिता प्रयत्न करावे अशी कळकळीची विनंती केली आहे.