*कोंकण एक्सप्रेस*
*चिपीहून आजपासून पुन्हा पुणे विमान सेवा*
*कुडाळ : प्रतिनिधि*
बंद असलेला परुळे-चिपी सिंधुदुर्ग विमानतळ १ एप्रिलपासून पुन्हा कार्यान्वित होणार आहे. सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग विमान सेवा मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार, रविवार नियमित सुरू होणार आहे. मात्र, अलायन्स एअरची मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवा १८ एप्रिलपासून फक्त शुक्रवारी एकच दिवस सुरू होणार आहे.
फ्लाय ९१ ची पुणे-सिंधुदुर्ग सेवा मंगळवार, १ एप्रिलपासून रोज सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार सकाळी ८.१५ वाजता विमान पुण्याहून सुटेल, तर १०.५५ वाजता चिपीहून धावणार आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता पुण्याहून आणि ९.५० वाजता चिपीहून, तर रविवारी सकाळ ९ वाजता पुण्याहून व ११ वाजता चिपीहून सुटेल. सोमवार आणि शुक्रवार ही सेवा सुरू राहणार नाही. अलायन्स एअरची मुंबई सेवा १८ एप्रिलपासून (फक्त शुक्रवारी) सुरू होणार आहे.
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची नोंद झाली असून जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, हवाई मार्गे पर्यटकांना सिंधुदुर्गात येण्यासाठी काही दिवस सिंधुदुर्ग विमानतळ कार्यान्वित असताना पर्याय होता त्यानंतर मोपा विमानतळाशिवाय पर्यटकांना सिंधुदुर्गात येण्यासाठी हवाई मार्ग उपलब्ध नव्हता. गेले काही दिवस चिपी विमानतळावरून पूर्णतः विमानसेवा ठप्प झाली होती. ती सेवा आता पुन्हा कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. ही सेवा नियमित सुरू राहिली, तर सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना सिंधुदुर्ग विमानतळाचा पर्याय निवडता येईल.