*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर यांचे उपचारादरम्यान निधन*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव-कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेले उभादांडा-सुखटणकरवाडी येथील रहिवासी आणि तिरोडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (५४) यांचे २८ मार्च रोजी पहाटे गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीने ओरोस सिंधुदुर्ग येथून आपले शासकीय कामकाज आटोपून मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासने मळगावच्या दिशेने वळत होते. त्याचवेळी समोर येणा-या दुचाकीची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला होता. अपघातात दोन्ही मोटरसायकलवरील चौघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवा बांबुळी येथे उपचारासाठी दाखल केले होते.
दरम्यान शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश करंगुटकर यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. ज्ञानेश करंगुटकर यांचा शांत स्वभाव, सर्वांना समजून घेण्याची वृत्ती, नाट्य क्षेत्राची आवड असल्याने सामाजिक नाटकांमध्ये सहभाग, मनमिळावू आणि हसत चेहरा असायचा. त्यांच्या निधनाने उभादांडा गावासह तिरोडा, नाणोस गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.