*कोकण Express*
*कृषि माल विक्रीकरिता मुंबई – गोवा महामार्गालगत बाजारपेठा बसवाव्यात*
*भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांची मागणी*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी मेवा पर्यटकांना मिळावा म्हणून नवी संकल्पना*
*शेतकरी नुकसानभरपाई देऊन सरकारने शब्द पाळावा; अशी केली मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.येथील शेतकरी, महिला यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी , कृषी व्यवसाय वाढावा , याकरिता शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांनी प्रक्रिया केलेला कृषि माल विक्रीकरिता मुंबई – गोवा महामार्गावर रस्त्याच्या लगत बाजारपेठा स्थापन कराव्यात. प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस बाजारपेठा बनविण्यात याव्यात. अशी मागणी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. यात आपल्या सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरित मिळावा अशी सुद्धा मागणी केली आहे.अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई ,पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशीही मागणी केली आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही व्हावी,शेतकऱ्यांना कोणत्याच स्थरावर न्याय मिळत नाही या बद्दल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी खंत व्यक्त केली आहे.

