*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ – पणजी एसटी बसला इन्सुली घाटात अपघात, 31 प्रवासी जखमी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी – इन्सुली – बांदा – पणजी महामार्गावर धावणाऱ्या कुडाळ – पणजी एसटी बस ला इन्सुली घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात 31 प्रवासी जखमी झाले. ड्रायव्हरने प्रसंगावधानता राखत गाडी उंचवटा असलेल्या भागाकडे वळविली असल्याने दुर्दैवी अपघात टळला. मात्र अपघाता पुर्वी गाडीच्या चाकाखाली काही तरी प्लास्टिकची वस्तू चिरडल्याचा आवाज आला याबाबत एसटी महामंडळाने चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात गाडीतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. दुपारी शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 रोजी दुपारी 03.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला.
या बसमध्ये 48 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी अपघातात 31 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले आहे.अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला अशी दुखापत झाली आहे. मात्र कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. एसटी बस चालक सचिन प्रताप कुडे ( वय 48 ) यांच्या छाती पोटाकडे स्टेअरिंग मुळे दुखापत झाली तर वाहक दिनेश दत्ताराम शिरवळकर ( वय 47 ) यांच्या डोक्याला दुखापत झाली.