*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड जामसंडे न. पं. चे स्ट्रीट लाईटचे १४ लाख ९६ हजारचे वीजबिल थकीत*
*सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा सभापती प्रणाली माने यांनी प्रशासनाला सुनावले खडेबोल*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे स्ट्रीट लाईटचे वीज बिल १४ लाख ९६ हजार रुपये थकीत असल्याने वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याबाबत वीज वितरण कंपनीने सर्व नगरसेवकांना पत्र पाठविली आहेत. प्रशासनाने वीज बिल का भरले नाही? निधीबाबतचा विषय तांत्रिक असून प्रशासनाने तो हाताळावा. मात्र देवगड-जामसंडे शहराची स्ट्रीट लाईट बंद होता कामा नये, असे कठोर शब्दात पाणी पुरवठा सभापती अॅड. सौ. प्रणाली माने यांनी प्रशासनाला सुनावले. यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे न. पं. चा स्वनिधी शिल्लक नसल्याने वीज बिल रखडले असून दोन दिवसांपूर्वी ५ लाख रुपये भरणा केले असल्याचे सांगितले.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा श्रीमती साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेस बांधकाम सभापती शरद टूकरूल, पाणी पुरवठा सभापती अॅड. सौ. प्रणाली माने, आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. आद्या गुमास्ते, मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगरसेविका सौ. अरुणा पाटकर, सौ. ऋचाली पाटकर, सौ. स्वरा कावले, सौ. तन्वी चांदोसकर, नगरसेवक तेजस मामघाडी, संतोष तारी, व्ही. सी. खडपकर, रोहन खेडेकर आदी उपस्थित होते.
देवगड जामसंडे नगरपंचायतीचे स्ट्रीट लाईटचे बिल १४ लाख ९६ हजार रुपये थकीत आहेत. हे बिल थकीत असल्याने वीज वितरण कंपनीने वीज बिल तात्काळ भरण्याची नोटीस नगरपंचायतीला दिली असून न भरल्यास रस्त्यावरील स्ट्रीट लाईट खंडित करण्याचा इशारा दिला आहे. या नोटीसीची प्रत सर्व नगरसेवकांना दिली आहे. याबाबत पाणीपुरवठा सभापती अॅड. सौ. प्रणाली माने यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी मुख्याधिकारी श्री. कांबळे यांनी न. पं. कडे स्वनिधी उपलब्ध नसल्यामुळे वीज बिल भरलेले नाही. स्वनिधी दहिबाव पंपाचे बिल व कर्मचाऱ्यांचा पगार यावर खर्च होतो. यावर माने यांनी नागरिकांकडून दिवा बत्ती कर घेतला जातो त्यामुळे स्ट्रीट लाईट बिल भरले पाहिजे. प्रशासनाचा जो काही विषय असेल तो प्रशासनाने सोडवावा. मात्र शहर अंधारात राहता कामा नये, असे सुनावले.
शहर विकास आराखड्यातील सूचना व बदल वेळीच न दिल्यास शासन आपल्या स्तरावर निर्णय घेईल ते निर्णय आपल्याला बंधनकारक राहतील. त्यामुळे येत्या दोन दिवसांत यावर लेखी सूचना पाठविणे आवश्यक आहेत. याबाबत सोमवारी विशेष सभा बोलावून शहर विकास आराखड्याबाबत निर्णय घ्यावा, असे मत मुख्याधिकारी श्री. कांबळे यांनी मांडले.