*कोंकण एक्सप्रेस*
*अरुणा धरणग्रस्थानी कालव्याचे काम मंगळवारपासून बंद पाडले*
*अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला दया*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला दया.या मागणीसाठी अरुणा धरणग्रस्थानी कालव्याचे काम मंगळवारपासून बंद पाडले आहे. जोपर्यंत पुनर्वसन गावाठाणात कालव्याचे पाणी देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही कालव्याचे काम करु देणार नाही. असा आक्रमक पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे.
आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी दया, अशी मागणी धरणग्रस्त धरणाच्या सुरवातीपासून करीत आहेत. पुनर्वसन गावठाणाच्या दोन्हीही बाजूने कालवे जात आहेत. मात्र पुनर्वसन गावठाणाला कालव्याचे पाणी देण्यात आलेले नाही. पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत.
मंगळवारी दुपारी आखवणे भोम पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्थानी रंगनाथ नागप, आकाराम नागप, डॉ. जगन्नाथ जामदार यांच्या नेतृत्वाखाली मांगवली, तिरवडे, कुसूर येथे सुरु असलेले कालव्याचे काम बंद पाडले. यावेळी अभय कांबळे, संजय नागप, सुरेश सुतार,अनंत मोरे, गणपत पडिलकर, वसंत नागप, शांताराम नागप, कृष्णा नागप, यांच्यासह मोठया संख्येने धरणग्रस्त उपस्थित होते. काम बंद केल्याची माहिती मिळताच याबाबत सायंकाळी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांनी पुनर्वसन गावठाणात येऊन धरणग्रस्थांची भेट घेतली. यावेळी धरणगग्रस्थानी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. आम्ही आमचे घरदार, जमीन जुमला या सर्वस्वाचा त्याग केला आहे. आमच्या त्यागातूनच तालुक्यातील १७ व राजापूर तालुक्यातील दोन गावांना धरणाच्या कालव्यातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र आम्ही विस्थापित होऊनही आम्हांला या धरणातील पाणी मिळत नसेल तर तो आमच्यावर अन्याय आहे. त्यामुळे गावठाणात कालव्याचे पाणी दिले जात नाही. तोपर्यंत आम्ही कोणत्याही कालव्याचे काम करू देणार नाही. असे ठणकावून सांगितले. त्यानंतर कार्यकारी अभियंता यादव यांनी धरणग्रस्तांसह सुरू असलेल्या कालव्याच्या ठिकाणावरून पुनर्वसन गावठाणाला कशाप्रकारे पाणीपुरवठा करता येईल याची पाहणी केली. तसेच पुनर्वसन गावठाणा कालव्याचे पाणी कुठून कसे देता येईल याचा सर्व्हे करून गावठाणाला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. बुधवारपासूनच याबाबतचा सर्व्हे करण्यात येईल असे सांगितले. तोपर्यंत कालव्याचे काम थांबवू नये असे आवाहन त्यांनी केले.मात्र धरणग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे कालव्याचे काम बुधवारी दुसऱ्या दिवशीही बंद होते.