*कोंकण एक्सप्रेस*
*तरेळे – गगनबावडा महामार्गाचे काम स्थानिक जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच – मंत्री नितेश राणे*
*उर्वरित भुसंपादनबाबत लवकरच तोडगा काढणार*
*स्थानिकांच्या मागण्या अधिका-यांनी पुर्ण कराव्यात*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत तरेळे – गगनबावडा रस्ता भुसंपादन बाबत बैठक संपन्न*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
शेतकरी व जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच तरेळे – गगनबावडा या महामार्गाचे रस्ता रुंदीकरणचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या मागण्या पूर्ण करा. अशा सुचना पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी यांना दिल्या. तसेच भुसंपादनबाबत लवकरच केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्ग काढणार असे प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी केले.
तरेळे – गगनबावडा रस्ता भुसंपादनबाबत ची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पार पडली. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अतुल शिवणिवार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक माजी संचालक गुलाबराव चव्हाण, वैभववाडी नगराध्यक्षा श्रध्दा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, बंड्या मांजरेकर, प्रकाश सावंत, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, कोकिसरे सरपंच प्रदीप नारकर, प्रवीण बोभाटे, व करुळ, एडगांव, कोकिसरे व नाधवडे गावातील शेतकरी उपस्थित होते.
करुळ गावातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात याव्यात, गावातील भुसंपादनचे विषय लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात तसेच करुळ वनविभाग कार्यालय नजीक अपघात होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होणे आवश्यक आहे. अशी मागणी नरेंद्र कोलते यांनी बैठकीत केली. गुलाबराव चव्हाण यांनी भुसंपादन तात्काळ करुन संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे असे सांगितले. सुधीर नकाशे, प्रदीप नारकर यांनी नाधवडे व कोकिसरे गावातील समस्या सांगितल्या.
शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. केंद्र व राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य राहील. परंतु अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून न्याय दिला पाहिजे. अशा सुचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.