*कोंकण एक्सप्रेस*
*सोनुर्लीत भजन रत्नं केळुसकर बुवा आणि प्रा.वैभव खानोलकर यांचा शाही सत्कार*
*वैगुले प्रतिनिधि : प्रथमेश गुरव*
नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली पाक्याची वाडी या ठिकाणी नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या ठिकाणी झालेल्या आमने-सामने डबलबारीच्या उद्घाटन सोहळ्याला सिंधू रत्न भजन सम्राट भालचंद्र केळुस्कर बुवा आणि लोककला अभ्यासक निवेदक व्याख्याते आणि उपक्रमाशील अध्यापक म्हणून सुप्रसिद्ध असणारे प्रा. वैभव खानोलकर उपस्थित होते
जवळपास 11 वर्ष पाक्याच्या वाडीतील येथील हे नवयुवक कला क्रीडा मंडळ विविध समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबवताना दिसते याच बरोबर अनेक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असते यावर्षी दशावतार नाटक आणि डबलबारीच आयोजन या मंडळाने करत जिल्ह्यातील या दोन रत्नांना आपल्या कार्यक्रमात निमंत्रित करत त्यांचा शाही सत्कार केला.
या मध्ये भालचंद्र केळुस्कर बुवा हे जवळपास तीन तप भजन क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी अनेक भजनी बुवा घडविलेले आहेत. आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या बुवांनी पारंपारिक डबलबारी, आमने सामने डबलबारी याचबरोबर अनेक दिग्गज गायक यांना नाट्य संगीतातही ऑर्गन वादन करून साथ संगत केली असुन,त्यांना अनेक विविध स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत ,त्यांचं कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा या मंडळाच्या वतीने शाही सत्कार केला
याचबरोबर लोककलेच्या क्षेत्रात अलीकडे सातत्याने समाजा समोर असणार नाव म्हणजे खानोली गावचे सुपुत्र प्रा. वैभव खानोलकर.हे एक अध्यापक असून सुद्धा दशावतार लोककलेमध्ये खानोलकर यांनी संशोधन करत ‘एक समृद्ध लोककला दशावतार’ या पुस्तकाचं प्रभावी लिखाण केले असुन, वेगवेगळ्या लोककलावंतांना व्यासपीठ देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होते.
लोककलावंतांचे प्रश्न त्यांची दुःख शासन दरबारी पोहोचवण्या साठी ते सातत्याने प्रयत्न करतात पण त्याचबरोबर लोककलेवर होणारे चुकीच्या गोष्टीवर सुद्धा ते परखडपणे बोलतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राज्यस्तरावर त्यानी निवेदन करत अनेकां दिग्गज मान्यवरांची शाबासकी मिळवलेली आहे. अभ्यासू निवेदन म्हणून सुद्धा अनेक संस्थांनी त्यांना गौरवलेला आहे, व्याख्याता, निवेदक ,लोककला अभ्यासक आणि उपक्रमशील शिक्षक, व्यासंगी पत्रकार असे विविध प्रकारच्या भूमिका वटवणाऱ्या वैभव खानोलकर यांचा ही या कार्यक्रमात सत्कार केला गेला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींना मानपत्र शाल व श्रीफळ आणि बुके देऊन विशेष शाही सत्कार करून गौरविण्यात आले.
त्याच बरोबर यावेळी मंडळाच्या वतीने भजन, दशावतार कला क्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात काम केलेल्यांचा विषेश सन्मान करण्यात आला. यामध्ये गावातील ए पी जे अब्दुल कलाम विशेष परीक्षेत उत्तीर्ण होऊन इस्त्रो आणि विमान प्रवासासाठी प्रविष्ट ठरलेली तसेच एक तबला वादक म्हणून ओळख मिळविलेल्या चैतन्या गावकर या मुलीचा, त्यानंतर पखवाज वादन परिक्षेत यश मिळविलेल्या लाडू मसुरकर,मुंबई सारख्या ठिकाणी डबलबारी स्पर्धेत तबला साथ देणारे अर्जुन पालयेकर, पोलिस पाटील म्हणून अलिकडेच निवड झालेल्या संदिप मोगम तसेच न्हावेली गावचे संदिप दळवी यांचा दशावता क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल तर बाल दशावतार कलाकार म्हणून निरवडे गावचा राज गोवेकर याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सिंधुभूषण भजन सम्राट बुवा भालचंद्र केळुसकर, लोककला अभ्यासक व लेखक प्रा.वैभव खानोलकर, बुवा अभिषेक शिरसाठ, बुवा समिर कदम, दशावतार कलावंत संतोष रेडकर,सोनुर्ली गावचे मानकर राजेंद्र गावकर,रमेश गावकर,भाई गावकर, सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर,पोलिस पाटील संदिप मोगम, धोंडू नाईक, विष्णू नाईक, हरी वारंग, न्हावेली देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद नाईक, चद्रकांत अणावकर आदी उपस्थित होते.