*कोंकण एक्सप्रेस*
*शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने मालवणी साहित्य संमेलन*
*आजगांव (सिंधुदुर्ग) साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग ५३ वा मासिक कार्यक्रम*
*प्रतिनिधि : संतोष साळसकर*
आजगांव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग ५३ व्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून सोमवार दि.३१ मार्च रोजी दुपारी ०३.३० ते रात्री ०८.०० या वेळेत शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने मालवणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील खटखटे ग्रंथालयाच्या कै.मच्छिंद्र कांबळी सभागृहात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी मालवणी बोलीभाषेचे अभ्यासक, घुंघुरकाठी या संस्थेचे संस्थापक तथा महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अधिकारी सतीश लळीत हे असणार आहेत.
पारंपरिक पद्धतीने संमेलनाचं उद्घाटन झाल्यावर मालवणी साहित्यात काय असावे, काय नसावे? या विषयावर मालवणी साहित्यिक तथा निवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात मालवणी साहित्यिक कल्पना मलये व मालवणी भाषेवर संशोधन करणाऱ्या तनुजा तांबे या सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘जयवंत दळवी यांचा मालवणीनामा’ हा जयवंत दळवींनी आपल्या कथा-कादंबऱ्यात वापरलेल्या मालवणी शब्दांचा ऊहापोह करणारा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
शेवटच्या सत्रात मालवणी भाषेत काव्यलेखन करणाऱ्या कवयित्री डॉ.सई लळीत यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे काव्यसंमेलन होईल. संमेलनाचे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या समारोप भाषणाने संमेलनाची सांगता होईल. संपूर्ण संमेलनाचे निवेदन सचिन दळवी हे करतील.
मालवणी बोली प्रेमींनी या संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा मालवणी कवी विनय सौदागर आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी केले आहे.