*आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजलेला ‘भेरा’ आज पासून रसिकांच्या भेटीला*

*आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजलेला ‘भेरा’ आज पासून रसिकांच्या भेटीला*

*कोंकण एक्सप्रेस*

*आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजलेला ‘भेरा’*

*आज पासून रसिकांच्या भेटीला*

*शिरगांव | संतोष साळसकर*

तळकोकणाच्या सौंदर्याने नटलेला आणि स्थानिक कलाकारांच्या वास्तव अभिनयाने सजलेला ‘भेरा’ हा चित्रपट आज २१ मार्च २०२५ पासून महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रदर्शित होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीतील लक्ष्मी थिएटर आणि झाराप येथील आराध्य या चित्रपटगृहांत संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट पाहता येईल.
श्री वैजप्रभा चित्र निर्मित हा चित्रपट प्रसाद खानोलकर यांच्या ‘साकव’ या कथेवर आधारित आहे. तर दिग्दर्शन श्रीकांत प्रभाकर यांनी केले आहे. या चित्रपटाची पटकथा प्रसाद खानोलकर आणि श्रीकांत प्रभाकर यांनी लिहिली आहे. तर समीर भास्कर यांचे छायांकन आहे.
या चित्रपटात दीपक जोईल, श्रद्धा खानोलकर, प्रमोद कोयंडे, आकांक्षा खोत, विवेक वाळके, गौरव राऊळ यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रपटगृहांची संख्या अत्यल्प असल्यामुळे २८ फेब्रुवारीपासून या जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, देवगड येथील नाट्यगृहांत ‘भेरा’ चित्रपट दाखविण्यात आला. या खेळांना सिंधुदुर्गातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे ज्या गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले, त्या शेळपी गावात ‘भेरा’ दाखवून शेळपीवासीयांना अनोखी मानवंदना देण्यात आली.
हा चित्रपट चेन्नई, जर्मनी, कान्स, पुणे आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजला आहे.


फ्रान्समधील कान्स या जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केटसाठी महाराष्ट्र शासनातर्फे ‘भेरा’ची निवड करण्यात आली होती. पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला दिग्दर्शन आणि कला दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाले. तर मुंबईत झालेल्या आशियाई चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांना प्राप्त झाला आहे. देशविदेशातील मान्यवरांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढा नावलौकिक मिळवलेला ‘भेरा’ हा पहिलाच मालवणी चित्रपट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!