*कोंकण एक्सप्रेस*
*रेडी यशवंतगड समुद्रकिनारा ते शिरोडा समुद्र किनारी येथे झुलता पूल व्हावा….*
*अधिवेशन काळात मंजुरी मिळावी : पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी*
*वेंगुर्ले : प्रथमेश गुरव*
रेडी शिरोडा भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास होण्याच्या दृष्टीने रेडी यशवंतगड समुद्रकिनारा ते शिरोडा समुद्र किनारी झुलता पूल होणे गरजेचे आहे. या पुलाच्या कामास मंजुरी मिळून कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी देण्यात आले असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार या पुलाच्या कामास या अधिवेशनात मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
शिरोडा पॅराडाईज बीच हे पर्यटनाचे खास आकर्षण आहे. सोनेरी वाळू , सुंदर सुरूच बाग, समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा तसेच शिरोडा समुद्रकिनारा आणि रेडी खाडी संगम हे स्थळ पाहण्यासारखे आहे. येथे ताज चा पंचतारांकित हॉटेल प्रकल्प उभा राहणार आहे. त्याच प्रमाणे रेडी गावात ग्रामदेवी श्री देवी माऊली (क वर्ग पर्यटन तीर्थक्षेत्र), पांडवकालीन श्री. देव गणपती मंदिर, ऐतिहासिक वारसा लाभलेला यशवंत गडकिल्ला, पांडवकालीन हत्तीचे सोंड, प्रसिद्ध रेडी तलाव, समुद्र किनारी असलेले सिद्धेश्वर मंदिर, दक्षिणा भीमुख हनुमान मंदिर अशी विविध धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे आहेत. म्हणूनच या भागात अनेक देशी, विदेशी पर्यटक, भाविक भक्त, शिवप्रेमी याचा आस्वाद घेण्यासाठी शिरोडा रेडी भागात भेट देत असतात.
रेडी समुद्र किनारी असलेल्या ऐतिहासिक यशवंत गड किल्ल्याच्या पायथ्याशी समुद्र आणि खाडी चा संगम आहे. आणि त्याच पलीकडे शिरोडा हे प्रसिद्ध गाव आहे. गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली, मिठाचा सत्याग्रह झालेले आणि स्वातंत्र्याची साक्ष देणारे मिठागर आहे. समुद्र किनारा आणि खाडी चा संगम ह्या सुंदर ठिकाणी रेडी यशवंत गड आणि शिरोडा वेळागर समुद्र किनारा जोडणारा झुलता फुल झाल्यास खऱ्या अर्थाने तो या भागासाठी पर्यटन सेतू ठरू शकतो. पर्यटकांना, शिवप्रेमींना, भाविकांना शिरोडा वेळागर वरून भ्रमंती करत रेडी यशवंत गड येथे येण्यास सुलभ होणार आहे. परिणामी या ठिकाणी अनेक स्थानिक युवकांना छोटी छोटी दुकाने उभी करून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या झुलत्या पुलामुळे पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळेच रेडी शिरोडा पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थ यांची सर्व मंत्री महोदय, खासदार, आमदार यांना कळकळीची विनंती आहे की, प्रशासन स्तर उपसचिव पर्यटन विभाग कडे हा प्रस्ताव थांबलेला आहे. २०२४ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाला शिफारस दिली होती. तरी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून सदर झुलता फुल साठी शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.