*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची गोपुरी आश्रमास सदिच्छा भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष व सर्वोदयी कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात १५ मार्च रोजी सायंकाळी गोपुरी आश्रमास भेट दिली. गोपूरी आश्रमाच्या कामाची माहिती करून घेतली व गोपुरीच्या ग्रामीण विकासाच्या सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी गोपूरी आश्रमाचे दिवंगत मार्गदर्शक जयवंत मटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गोपूरी आश्रमाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जयवंत मटकर यांच्या प्रेरणेमुळेच मी सर्वोदयात चांगल्या प्रकारे काम करू शकलो, गांधी-विनोबा-अप्पा पटवर्धन ही माझी प्रेरणास्थाने आहेत. त्यांच्या विचाराने मी यापुढील काळात महाराष्ट्रात काम करण्याचा संकल्प केला आहे. गांधी विचारांच्या इतर संस्थांप्रमाने गोपुरी आश्रम हे सुद्धा माझे प्रेरणास्थळ आहे. आज गोपूरी आश्रमाच्या भेटीमुळे मला विशेष आनंद झाला. मला या संस्थेच्या भेटीमुळे माझ्या पुढील कार्यास प्रेरणा मिळाली असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांनी अप्पासाहेबांच्या पुतळ्यास खादीच्या सुताचा हार अर्पण केला. गोपुरी आश्रमाच्या सफाई प्रदर्शनाची पाहणी केली. गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी गोपुरी आश्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या भेटीच्या वेळी गोपुरी आश्रमाचे पदाधिकारी सदस्य व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी सदस्य आणि जिल्ह्यातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.