*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा पारंपरिक शिमगोत्सव*
*धूळ फेकण्याच्या पारंपरिक सोहळ्याने उत्सवाची सांगता*
*शिरगाव : संतोष साळसकर*
चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा शिमगोत्सव पारंपरिक रीतिरिवाजांनुसार उत्साहात साजरा केला जात आहे. या शिमगोत्सवाची सांगता गावकोळणीचा लग्नसोहळा आणि धूळ फेकण्याच्या पारंपरिक सोहळ्याने होते.
फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला (गुरुवारी) मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने पाच दिवसीय शिमगोत्सवाला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात प्रथम श्री वशिक तळखंबा मंदिरासमोर तसेच इनामदार श्री पावणाई देवालयासमोर आंब्याच्या झाडाची गाव होळी उभी केली जाते. या होळीची ब्राह्मणांकरवी पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर बारा स्थळांत व इतर ठिकाणीही होळ्या उभ्या केल्या जातात.
दुसऱ्या दिवशी सकाळी होळदेवाकडे कौलप्रसादाद्वारे मान्यता घेऊन गाव-घराची रखवाली घेतली जाते. त्यानंतर कौलप्रसादाच्या माध्यमातून येणाऱ्या लोकांच्या अडचणी सोडविण्यात येतात.
दररोज रात्री शिंपी समाजबांधवांच्या वतीने गावकोळीण सजवली जाते. त्यानंतर होळीच्या ठिकाणी येऊन एखादा वग सादर केला जातो आणि नंतर मंदिरात पारंपरिक तमाशाचा कार्यक्रम रंगतो.
गावकोळीण परंपरेनुसार संपूर्ण गावात फिरते. पाचव्या दिवशी सकाळी निशाण व तळीचे पूजन करून ढोल-ताशांच्या गजरात मानकऱ्यांच्या घरी निशाण नेले जाते आणि नंतर संपूर्ण गावात ते फिरवले जाते. या रात्री शिंपी समाजबांधवांच्या वतीने इनामदार श्री पावणाई मंदिराच्या सभामंडपात गण, गवळण आणि गावकोळणीचा रंगतदार लग्नसोहळा साजरा केला जातो.यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर धूळ फेकण्याच्या पारंपरिक सोहळ्याने शिमगोत्सवाची सांगता होते. यानंतर ही होळी चैत्र पौर्णिमेला तोडली जाते. यावेळी होळीच्या आंब्येरात बांधलेले श्रीफळ वाढवून त्याचा प्रसाद उपस्थितांना वाटप केला जातो.
हा शिमगोत्सव पारंपरिक रीतिरिवाजांनुसार बारा-पाच मानकरी, गावघर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ,सहभागातून भक्तीभावाने व उत्साहात साजरा केला जातो.