*होडी सेवा सुरू होवू देणार नाही..दांडीवासिय आक्रमकपणे लढा देण्यासाठी सज्ज*

*होडी सेवा सुरू होवू देणार नाही..दांडीवासिय आक्रमकपणे लढा देण्यासाठी सज्ज*

*कोंकण एक्सप्रेस*

*होडी सेवा सुरू होवू देणार नाही..दांडीवासिय आक्रमकपणे लढा देण्यासाठी सज्ज*

*मालवण  : प्रतिनिधी*

शासनाने मालवण दांडी येथून किल्ला होडी सेवा सुरू करण्याची परवानगी देताना दांडी येथील पर्यटन व्यावसायिकांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेता इतर ठिकाणच्या व्यक्तींच्या प्रस्तावांना मान्यता देतानाच या प्रस्तावांमध्ये बंदर विभागातील अधिकारी असलेल्या व्यक्तींचे अनेक प्रस्ताव मंजूर असून कार्यालयातील इतर कर्मचारी असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचाही प्रस्ताव आहे. तसेच राजकीय मंडळींच्या नातेवाईकांनीही यात आपला फायदा साधल्याचा आरोप करीत दांडी येथील पर्यटन व्यावसायिक यांनी बंदर विभागाच्या मनमानी कारभाराबद्दल थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत तसेच बंदर विभागातील संबंधित अधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात यावीत यासाठी आम्ही बुधवारपासून पुन्हा तीव्र लढा उभारणार आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

हॉटेल कोनार्क याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन व्यावसायिक बोलत होते. यावेळी मेघनाद धुरी, रूपेश प्रभू संतोष परब, सौ. मिनल परब, नरेश कोयंडे, जितेंद्र शिरर्सेकर, विठोबा केळुसकर, संतोष केळुसकर, प्रविण पराडकर, विष्णू मालंडकर, रश्मीन रोगे, मनिष तळागावकर, नंदन लुडबे, चारूदत्त आचरेकर, महादेव कोयंडे, राहुल नरे, संतोष केळुसकर, तुकाराम तळगावकर आदी उपस्थित होते. दांडी येथील सहा पर्यटन व्यावसायिकांनी केलेल्या साखळी उपोषणाच्यावेळी अकरा जणांना होडी सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे पत्र बंदर विभागाकडून देण्यात आले होते. या यादीमध्ये दिसून आलेली नावे पाहून उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आणि त्याचवेळी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही बंदर विभागाला दिला होता,

 

बंदर विभागाने यावेळी प्रथमच दांडी किल्ला होडी सेवेसाठी एक लाख रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम निश्चीत केलेली आहे. अशाप्रकारे कोणतीही परवानगी देताना सुरक्षा अनामत रक्कम बंदर विभागाकडून घेतली जात नसताना यावेळी पहिल्यांदाच लादण्यात आलेली आहे. किल्ला होडी सेवेतून किरकोळ पैसे मिळणार असल्याने तब्बल एक लाख रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम ही सर्वसामान्य मच्छीमार आणि पर्यटक व्यावसायिक यांना परवडणारी नाही. सदरची रक्कम धनदांडग्या व्यावसायिकांसाठी किरकोळ आहे. सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक अशी ही अनामत रक्कम असल्याने याच्या विरोधातही न्याय मागण्यात येणार असल्याचेही यावेळी दांडीवासियांनी स्पष्ट केले.

बंदर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नातेवाईकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. सदरच्या व्यक्ती या दांडी येथे वास्तव्यास नसतानाही त्यांच्या प्रस्तावांना प्राधान्य देण्यात आलेले आहेत. किल्ला र होडी सेवा ही बंदरजेटी येथून सुरू असतानाही आम्ही कधीही दांडी येथून त्याठिकाणी होडीसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिले नाही, अगर त्यामध्ये सहभागही घेतला नाही. मात्र दांडी येथील किल्ला होडी सेवेसाठी शहरातील अन्य भागातील व्यक्तींना मान्यता देताना स्थानिक दांडीवासियांचे प्रस्ताव मागे ठेवण्यात आल्याने बंदर विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मुख्य बंदर अधिकारी यांची मिलीभगत असल्याने या सर्वांची पोलखोल करण्यासाठी दांडीवासिय आक्रमकपणे लढा देण्यासाठी सज्ज झाले आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

होडी सेवा सुरू होवू देणार नाही

दांडीवासियांचे प्रस्ताव मागे ठेवून इतरांचे प्रस्ताव मंजूर करणाऱ्या बंदर विभागाच्या कारभाराच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून तोपर्यंत दांडी येथून किल्ला होडी सेवा सुरू होवू देणार नाही. आम्ही आमच्या भागातून होणाऱ्या होडी सेवेसाठी प्रयत्नशिल असताना आमच्यावर अन्याय करून बंदर विभागातील अधिकारी मनमानीपणे आपल्या नातेवाईकांना प्राधान्य देत असतील तर आम्ही एकही होडी सुरू होवू देणार नाही, असा थेट इशारा यावेळी दांडी वासियांनी दिला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, बंदर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेही लक्ष वेधण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!