*कोंकण एक्सप्रेस*
*आम. निलेश राणे यांचा वाढदिवस भव्यदिव्य कार्यक्रमाने साजरा होणार – दत्ता सामंत*
*मालवण (प्रतिनिधी)*
कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर भव्यदिव्य कार्यक्रमाने साजरा होणार असून यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने शिवायन हे महानाट्य सादर होणार आहे, यासाठी १२ हजार लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर दत्ता सामंत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी यावेळी बबन शिंदे, संजय पडते, दीपक पाटकर, विश्वास गांवकर, आनंद शिरवलकर, सौ. दीपलक्ष्मी पडते, मधुकर चव्हाण, किसन मांजरेकर, जॉन नरोना आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, आम. निलेश राणे यांचा वाढदिवस मतदार संघाबरोबर संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. आम. राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी असला तरी सध्या अधिवेशन सुरू असल्याने आम. निलेश राणे यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने वाढदिवस १६ मार्च रोजी साजरा करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने त्यांचा वाढदिवस १६ मार्च रोजी बोर्डिंग ग्राउंड येथे भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या कार्यक्रमास आम. निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार असून ७ वा. केक कापण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शिवायन हे महानाट्य सादर होणार आहे. या नाट्यासाठी बोर्डिंग ग्राउंडवर १२ हजार लोक बसू शकतील अशी आसन व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे, असेही दत्ता सामंत यांनी सांगितले.
या वाढदिवस कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार किरण सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच जनता देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहील, असेही दत्ता सामंत यांनी सांगितले.