*कोंकण एक्सप्रेस*
*राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधि*
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे कणकवली येथे आयोजन करण्यात येणार आहे.
रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून श्री. विकास खारगे, मा. अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभीषण चवरे यांच्या नियोजनाखाली या प्रशिक्षण शिविराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना नाटकाच्या तंत्राचा अभ्यास व्हावा, योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी हे नाट्य प्रशिक्षण शिबिर दिनांक १२ मार्च ते २१ मार्च २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत होणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरासाठी मर्यादित जागा असून वय वर्षे १४ ते ४० या वयोगटातील नवोदित कलाकारांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.
प्रशिक्षणामध्ये कुठलेही मूल्य आकारले जाणार नसून प्रवेश विनामूल्य आहे.
या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ नाट्य कलावंत, तंत्रज्ञ, लेखक हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. सोबतच प्रशिक्षण संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सादरीकरणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
एच पी सी एल सभागृह, कणकवली कॉलेज येथे उद्या दिनांक 12 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता, श्री दीक्षांत देशपांडे तहसीलदार कणकवली, श्रीमती गौरी पाटील मुख्याधिकारी कणकवली नगरपंचायत, ज्येष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सदर नाट्य प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन होणार असून नाट्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
तरी या नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेसाठी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अक्षरसिंधु चे शिबिर संचालक विजय चव्हाण, संजय राणे, प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केलेले आहे.