*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथे महिलादिनास उत्स्फूर्त प्रतिसाद*
*”बेटी बचाओ बेटी पढाओ” घोषणांनी परिसर दुमदुमूला*
*साळशी-सरमळेवाडी शाळा व देवणेवाडी अंगणवाडी यांचा सयुक्त उपक्रम*
*शिरगाव : संतोष साळसकर*
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून प्राथमिक शाळा साळशी-सरमळे वाडी व देवणेवाडी अंगणवाडीत संयुक्तरित्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्त्रीशक्तीच्या गौरवासाठी साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना ग्रामपंचायत सदस्य आदिती रावले व योगिता परब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी साळशी- सरमळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक समाधान कोळी यांनी ,महिलादिन हा स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. समाजाच्या उन्नतीसाठी महिला सक्षम असणं अत्यंत गरजेचं आहे.असे उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन केले.तसेच देवणेवाडी अंगणवाडी सेविका प्रतिक्षा शिवलकर यांनी, स्त्रिया केवळ कुटुंबाचा आधार नसून समाज प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर त्या निर्णायक भूमिका बजावतात. महिलादिन त्याच योगदानाची आठवण करून देतो.असे मत व्यक्त केले.
यावेळी संसाराच्या राहाटगाडग्यातून थोडासा विरंगुळा मिळावा, म्हणून महिलांसाठी संगीत खुर्ची व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाने उपस्थित महिलांमध्ये आनंद आणि उत्साह संचारला.
यानंतर काढण्यात आलेल्या प्रबोधन फेरीत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या आवाजात उमटलेला सामाजिक संदेश प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या आदिती रावले, योगिता परब, स्वप्नाली मिराशी, मिनाक्षी लाड, स्वरा मिराशी, दिव्या बागवे, मिनाक्षी देवणे, संजना देवणे, राधा सावंत, उषा रावले, अंगणवाडी सेविका प्रतिक्षा शिवलकर, मदतनीस संध्या नाईक, मुख्याध्यापक समाधान कोळी, विद्यार्थी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्री ही संस्कृतीची जननी, संस्कारांची शिदोरी आणि समाज विकासाचा आत्मा आहे.