*कोंकण एक्सप्रेस*
*साळशीतील ‘ ते’ विवर हे निसर्गनिमित ‘ सिंक होल ‘ आहे – पृथ्वीराज बर्डे*
*शिरगाव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी देवणेवाडी येथील सापडलेले रहस्यमय विवर हे ‘ सिंक होल’ असून ते निसर्गनिर्मित आहे. आपल्या कोकणातील कातळ सड्यावर अशा प्रकारची अनेक सिंक होल आढळून येतात. यापैकी काही शोधली गेलेली आहेत. तर काहींचा शोध अजूनही लागायचा बाकी आहे. पावसाच्या पाण्यामध्ये कार्बन डाय ऑक्साईड विरघळल्यामुळे पाण्याचा सामू म्हणजे पी एच हा कमी होतो. आणि असा आम्लधर्मी पाऊस या खडकांवर पडल्यामुळे यात असलेले क्षार या पाण्यात हळूहळू विरघळतात व त्यामुळे खडक ठिसूळ होतो आणि मग तो खडक कोसळून त्याची माती खाली पडते. त्यातून अशा प्रकारे ‘ सिंक होल’ ची निर्मिती होते. असे मत भूगर्भ संदर्भातील माहिती देणारे कणकवली विद्यामंदिर कॉलेजचे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांनी साळशी येथे बोलताना व्यक्त केले.
देवगड तालुक्यातील साळशी येथील गणपत उर्फ बाळा नाईक यांना देवणेवाडी येथील ‘ पेरवणीचे माळ ‘ या ठिकाणी आंबा काजू बागेमध्ये साफसफाई करताना काही दिवसापूर्वी एक मोठे विवर सापडले. सदरच्या माळरानावर सापडलेल्या या विवराचे तोंड खूपच अरुंद असून. मात्र आत डोकावल्यास सुमारे आठ फूट खोलीचे आणि सात फूट गोलाई व्यासाचे विवर आहे.
याबाबत भूगर्भ संदर्भात माहिती देणारे कणकवली विद्यामंदिर कॉलेजचे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांना या ठिकाणी बोलवण्यात आले त्यावेळी त्यांनी माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की आपल्या कोकणात जांभा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. त्यापासून लाल माती ची निर्मिती होते. या लाल मातीत आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड आढळते. अशा या जांभ्या दगडाला शास्त्रीय भाषेत लेटराईज म्हटले जाते. सदरचे विवर हे निसर्गनिर्मित असून आत नक्कीच पाण्याचा साठा असू शकतो. त्यामुळे या विवराचे उत्खनन झाल्यास अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो.
सदरच्या या विवरामध्ये चाफेड ग्रा. पं. सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर, विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे, इतिहास प्रेमी शिक्षक अमोल शेळके यांनी प्रत्यक्ष आत विवरामध्ये उतरून माहिती घेतली असता हे विवर सुमारे ७ फूट व्यासाचे गोलाई आकाराचे असून आत ७ ते ८ माणसं बसू शकतात एवढी प्रशस्त जागा आहे. वरून पाहता निमुळत्या आकाराचे असले तरी आहात हे विवर पूर्णतः गोलाई आकारात ७ फूट व्यासाचे आहे. आतील माती मध्ये खूप ओलावा आहे. या मातीमध्ये लहान बेडकींचा वावर आहे. त्यामुळे नक्कीच या विवराच्या आत पाण्याचा मुबलक साठा असू शकतो. मात्र याचे उत्खनन होणे आवश्यक आहे. सध्या या विवराची खोली सुमारे ७ फुटापर्यंत असून या विवराचे उत्खनन झाल्यास आतील साचलेल्या मातीचा ढिगारा बाहेर काढल्यास या विवराची खोलाई १५ ते २० फुटापर्यंत होऊ शकते. पर्यायाने अनेक गोष्टींचा रहस्यमय गोष्टीचा उलगडा होऊ शकतो.
यावेळी जमीन मालक गणपत उर्फ बाळा नाईक, मावळे आम्ही स्वराज्याचे या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर, कणकवली विद्यामंदिर चे विज्ञान शिक्षक तथा भूगर्भ तज्ञ लपृथ्वीराज बर्डे, इतिहास प्रेमी शिक्षक अमोल शेळके, साळशी पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, चाफेडचे माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, चाफेड ग्रा.पं. सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर, महेश परब, निलेश नाईक, उमेश नाईक, केशव लब्दे, मनोज नाईक , संदीप वरेकर, प्रदीप नाईक, उदय सावंत, गणेश नाईक आदी उपस्थित होते