*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – संदीप साटम*
*ओंबळ-देऊळवाडी ते काझरवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न*
*शिरगाव : संतोष साळसकर*
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास वेगाने होत आहे. आमदार असताना मतदारसंघात कोणतीही कमतरता भासू दिली नाही आणि आता पालकमंत्री म्हणून विकासकामांचा वेग अधिक वाढवला आहे. कोणत्याही विकासकामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी ओंबळ येथे केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या ओंबळ-देऊळवाडी ते काझरवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संदीप साटम यांच्या हस्ते पार पडले. या कामासाठी ४ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
यावेळी संदीप साटम म्हणाले, “पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सुचवलेले प्रत्येक विकासकाम मार्गी लावले जाईल. हा रस्ता म्हणजे केवळ दळणवळणाचे साधन नसून ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी उभारी देणारे पाऊल ठरणार आहे.”
चाळीस वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
ओंबळ गावातून काझरवाडी येथे जाण्यासाठी यापूर्वी १३ किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. नव्या रस्त्यामुळे १० किलोमीटरचे अंतर कमी होणार असून ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
या सोहळ्यात देवगड मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंगेश लोके, ओंबळ सरपंच अरुण पवार, उपसरपंच प्रवीण पवार, पोलिस पाटील संजय पवार, नाद सरपंच प्रवीण पाष्टे, अनिल परब, बबलू कदम, नामदेव पवार, मोहन पवार, अजित पवार, सयाजी पवार, श्यामसुंदर पवार, जनार्दन पवार, ग्रामसेवक नागनाथ भिसे, भालचंद्र पवार, श्यामसुंदर जाधव, पांडुरंग घाडी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.