*जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याहस्ते आंबा स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन*

*जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याहस्ते आंबा स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन*

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याहस्ते आंबा स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन*

*देवगड: प्रशांत वाडेकर *

देवगड तालुका आंबा उत्पादक सह. संस्था मर्या. जामसंडे येथे आंब्यामधील साका ओळखणाऱ्या आंबा स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, देवगड तालुका आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. अजित गोगटे, तहसीलदार आर. जे. पवार, जिल्हा बँक संचालक ॲड. प्रकाश बोडस, ॲड. अविनाश माणगावकर, नंदकुमार घाटे, प्रा. बलवान, सुधीर जोशी, विद्याधर जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले, सिंधुरत्न समृद्ध योजना व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या अर्थसहाय्याने घेण्यात आलेल्या या मशीनमुळे आंबा बागायतदाराना मोठा फायदा होणार आहे. या मशीनमुळे ग्राहकांना खात्रीशीर आंबा मिळणार असून बागायतदारांना दरही चांगला मिळेल. देवगडचे नाव हे हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध झाले आहे. यापूर्वी आंब्यामधील साका ओळखणारी मशीन नसल्यामुळे ग्राहकाला विकलेला आंबा खराब निघायचा. त्यामुळे ग्राहक तुटायचा. आता ही अडचण दूर झाली आहे. आता साका ओळखणारी मशीन उपलब्ध झाल्यामुळे आंबा बागायतदारांनी आंबा परदेशात निर्यात करण्यासाठी पाऊले उचलावीत. मोपा व चिपी ही दोन विमानतळे आपल्याला उपलब्ध आहेत. यावर्षी पासून हापूस आंब्याला कोडिंग केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही, असेही ते म्हणाले.
नांदगाव येथील मार्केटयार्डचे १५ दिवसांत भूमिपूजन- मनीष दळवी
देवगड हापूस आंब्यासह जिल्ह्यात पिकणाऱ्या फळ, पिकांना चांगले मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी नांदगाव येथे सुमारे १४ एकर क्षेत्रात जिल्हा बँक पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून मार्केटयार्ड उभारत आहे. यासाठी आवश्यक असलेली जागा जिल्हा बँकेने खरेदी केलेली आहे. या मार्केटयार्ड साठी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत ४ कोटी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सुविधा देण्याचा प्रयत्न केला पण अडचणीच वाढल्या- ॲड. अजित गोगटे
वाशी मार्केट मधील दलालांवर अवलंबून असलेल्या आंबा बागायतदारांना खुले मार्केट उपलब्ध करून द्यावे यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सह. संस्था मर्या. जामसंडे या संस्थेची स्थापना केली. आंबा निर्यात व्हावा यासाठी पणन व महामंगो सोबत अनेक उपक्रम राबविले. आंबा बागायतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळाच्या मदतीने आंबा निर्यात सुविधा केंद्र उभारले. एक रुपया भाड्याने यासाठी जागा उपलब्ध करून दिली. कोल्डस्टोरेज उभारले. पण पणन मंडळाच्या ध्येय धोरणामुळे त्या सुविधांचा फायदा आंबा बागायतदारांना होऊ शकला नाही. दाभोळे येथे आंबा कॅनिग फॅक्टरी उभारली. मात्र तीही व्यवस्थित चालू शकली नाही. बँकेचे कर्ज व व्याज यामध्ये संस्थेला आर्थिक फटका बसला. त्यातून भाजप नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे बाहेर पडलो. आंब्यामधील साका ओळखणारी मशीन उपलब्ध होणे आवश्यक होते. त्यासाठी जिल्हाबँक व सिंधुरत्न योजना यांच्या सहकार्यामुळे आंबा स्कॅनिंग मशीन सुविधा उपलब्ध झाली आहे.
यावेळी आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी तर आभार सुधीर जोशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!