*कोंकण एक्सप्रेस*
*आम. निलेश राणे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा होणार – दत्ता सामंत*
*मालवण ः प्रतिनिधी*
कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ४ वाजता शिवायन या महानाट्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम. निलेश राणे यांचा वाढदिवस मतदार संघाबरोबर संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले
कुंभारमाठ येथील निवासस्थानी दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बबन शिंदे, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, महेश राणे, संतोष साठविलकर, पराग खोत, बाळू नाटेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, सध्या अधिवेशन सुरू असल्याने निलेश राणे यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने वाढदिवस १६ मार्च रोजी साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यात १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शिवायन या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे महानाट्य सर्वसामान्य शेतकरी, महिला भगिनी यांनाही पाहता यावे. यासाठी ग्रामीण भागातून त्यांना येथे आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भैया सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
आम. राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदार संघातील साडेतीनशे ते चारशे जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्या शाळांची पटसंख्या ५० हून अधिक आहे. अशा शैक्षणिक संस्थांना मेडिकल किट उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहितीही श्री. सामंत यांनी यावेळी दिली.